Mouse In Home : घरात उंदरांचा सुळसुळाट? या 5 सोप्या उपायांनी उंदरांना घरातून कायमचे हाकलवा
घरात अन्न उघडं ठेवणं, छोट्या फटी आणि घराबाहेरील कबाडामुळे उंदरांना घरात शिरण्याची संधी मिळू शकते. काही सोप्या उपायांनी त्यांचा वावर कमी करण्यास मदत होऊ शकते.

घरात उंदीर दिसला की घरातील सगळ्यांचीच धावपळ होते. पुठ्ठे, बॉक्स महत्त्वाच्या वस्तू उंदीर कुरतडू नये म्हणून लपवालपवी सुरू होते. शेवटी उंदीर तिथपर्यंत पोहोचतोच आणि सगळ्याची वाट लागते. टोमॅटो, फळे, कपडे हे उंदरांना फार आवडते. त्यामुळे किचनमध्ये आणि कपाटामध्ये त्यांच्या धुडगुस जरा जास्त दिसतो. बरं मग त्याला कितीही हाकलवून तरी ते घरात येतातच आणि मारण्याची इच्छा तर आपली होतच नाही. मग अशावेळी काही सोप्या टिप्समुळे तुम्ही उंदरापासून कायमची तुमची आणि तुमच्या घराची सुटका करू शकता.
सर्वात आधी उंदरांचा घरात येण्याचा मार्ग बंद करा
भिंती, दरवाजे,खिडक्या, पाईपच्या आसपास किंवा वेंटिलेशनच्या जागी छोटी फट किंवा छिद्र आहे का हे तपासा. उंदीर अगदी बारीकश्या जागेतूनही येऊ शकतात. त्यामुळे त्या जागा आणि फटी सीमेंट लावून कायमच्या बंद करा. दरवाज्याच्या खाली जागा राहत असेल तर तिथे डोअर स्वीपचा वापर करा.
किचनमध्ये अन्न उघडं ठेवू नका
उंदरांना घरात येण्यासाठी अन्नाचा वास मोठं कारण ठरू शकतो. त्यामुळे पीठ, तांदूळ, डाळी, बिस्किट आणि इतर खाद्यपदार्थ हवाबंद डब्यात ठेवा. किचनच्या ओट्यावर किंवा कुठेही अन्न उघडे ठेवू नका. घरात स्वच्छता ठेवा.
घरातलं कबाड कमी करा
जुने पेपर, कार्डबोर्डचे बॉक्स, न वापरणारे कपडे किंवा बराच काळ पडून असलेले सामानाच्या ठिकाणी उंदीर मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे पेपरचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा.
पेपरमिंट ऑइलचा उपाय
उंदीर दिसतात अशा ठिकाणी पेपरमिंट ऑइलचा वापर करा. कापासाच्या बोळ्यावर पेपरमिंट ऑइलचे काही थेंब लावून उंदीर जिथून येतो तिथे ठेवा. किंवा पाण्यात पेपरमिंट ऑइल टाकून त्या ठिकाणी स्प्रे करा यामुळे उंदीर येणार नाहीत.
घराच्या बाहेरची जागी स्वच्छ ठेवा
बाल्कनी, बाग किंव स्टोअर एरियामध्ये जुने सामान लाकूड, सुकलेली पानं किंवा दाट झाडझुडपं साचू देऊ नका. अशा जागा उंदरांना लपण्यासाठी चांगल्या असतात. त्यामुळे त्या वेळीच साफ करा.
