
सकाळचा हेल्दी नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच आहे, विशेषतः लहान मुलांसाठी. हेल्दी नाश्ता केल्याने मुलांना ऊर्जा मिळते तसेच त्यांचे लक्ष व्यवस्थित केंद्रित होते आणि दिवसभर मुलं सक्रिय राहतात.
बऱ्याचदा पालकांना काळजी असते की मुलांना असे काय द्यावे जे हेल्दी असेल आणि ते आनंदाने खातील. यासाठीच आज आम्ही मुलांसाठी 5 हेल्दी नाश्त्याचे पदार्थ सांगणार आहोत जे मुलांना आवडतील आणि त्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतील.
1. पोहे
पोहे हा एक पौष्टिक आणि सहज पचणारा नाश्ता आहे, जो मुलांना सहज खाता येतो. त्यात कार्बोहायड्रेट्स, लोह आणि फायबर असतात, जे मुलांना ऊर्जा देतात. तसेच पोहे पचायला सोपे असते आणि आरोग्याला पोषण देखील देते.
बनवण्याची पद्धत
पोहे पाण्याने धुवून मऊ करा.
एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा आणि त्यात मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाका.
आता यात बारीक चिरलेला कांदा, हळद, मीठ आणि शेंगदाणे टाकून परतून घ्या.
आता कांदा शिजल्यावर त्यात पोहे टाकून मिश्रण चांगले मिक्स करा आणि मंद आचेवर 5 मिनिटे शिजवा.
वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
2. ओट्स इडली
ओट्स इडली हा मुलांसाठी नियमित इडलीऐवजी एक आरोग्यदायी पर्याय आहे. आणि ओट्स इडली मुलांना खायला आवडेल. कारण ओट्समध्ये भरपूर फायबर असते, यामुळे पचनक्रिया निरोगी राहते आणि वजन समतोल राखण्यास मदत करतात, जे मुलांसाठी खूप महत्वाचे आहे.
बनवण्याची पद्धत-
1 कप ओट्स, अर्धा कप रवा आणि अर्धा कप दही मिक्स करून पेस्ट बनवा.
त्यात मीठ, बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर, बीन्स, सिमला मिरची) टाका.
मिश्रण इडलीच्या साच्यात टाका आणि 10-12 मिनिटे वाफ घ्या.
नारळाच्या चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत ओट्स इडली सर्व्ह करा.
3. मल्टीग्रेन पराठा
पांढऱ्या पिठाऐवजी मल्टीग्रेन पीठ वापरून तुम्ही मुलांना निरोगी पराठे देऊ शकता. मल्टीग्रेन पीठ हे प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत आहे.
बनवण्याची पद्धत-
गहू, ज्वारी, बाजरी आणि बेसन हे सर्व पीठ समप्रमाणात एकत्र करून मल्टीग्रेन पीठ तयार करा.
पिठात थोडे मीठ आणि तेल टाकून मळून घ्या.
पराठ्यासाठी तुम्ही पनीर, बटाटा किंवा पालक यांचे स्टफिंग बनवू शकता.
तव्यावर तूप लावून पराठा दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या आणि दही किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.
4. फ्रुट योगर्ट
जर तुमच्या मुलाला नाश्त्यात हलके काहीतरी खायला आवडत असेल, तर फ्रुट योगर्ट हा एक उत्तम पर्याय आहे. फळांमध्ये अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी त्यांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाची असतात.
बनवण्याची पद्धत
एका भांड्यात दही किंवा ग्रीक दही घ्या.
त्यात केळी, सफरचंद, डाळिंब, द्राक्षे आणि स्ट्रॉबेरी अशी बारीक काप केलेली फळं त्यात मिक्स करा.
यात तुम्ही मध, सुकामेवा आणि चिया बियाणे देखील टाकू खाऊ शकता.
5. स्प्राउट्स चाट
मोड आलेले कडधान्य हे प्रथिने आणि जीवनसत्त्वांचे एक पॉवरफुल केंद्र आहे. अशातच तुम्ही नाश्तात मुलांना स्प्राउट्स चाट बनवून खायला देऊ शकतात. ते खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. हे चाट चवदार बनवण्यासाठी चाट मसाला आणि लिंबाच्या रस यात टाका.
बनवण्याची पद्धत
मोड आलेले चणे, मूग, हे पाण्यात शिजवून घ्या.
आता चाट बनवण्यासाठी बारीक चिरलेली काकडी, टोमॅटो, कांदा शिजलेले चणे मुग यामध्ये मिक्स करा.
त्यानंतर त्यात मीठ, काळी मिरी, लिंबू आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)