हेल्दी घरासाठी प्रत्येक खोलीत लावा ‘ही’ झाडं
इनडोअर प्लांट्स केवळ घराची शोभा वाढवत नाहीत, तर वातावरणही शुद्ध करतात. पण प्रत्येक खोलीतील वातावरण वेगळे असल्याने, योग्य झाडांची निवड करणे महत्त्वाचे आहे. चला, कोणत्या खोलीत कोणती झाडे लावल्यास आरोग्याला फायदा होईल, ते जाणून घेऊया.

घरात नैसर्गिक आणि आरोग्यदायी वातावरण तयार करायला आवडत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. घर सुंदर दिसण्यासाठी झाडं लावण्याची आवड अनेकांना असते. पण तुम्हाला माहीत आहे का, प्रत्येक झाड प्रत्येक जागेसाठी योग्य नसते? वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावणे उत्तम असते, कारण काही झाडांना जास्त प्रकाश लागतो, तर काही झाडं कमी उजेडातही चांगली वाढतात. चला, तर मग कोणत्या खोलीत कोणतं झाडं लावणं सर्वात फायदेशीर आहे, ते जाणून घेऊया.
प्रत्येक खोलीसाठी योग्य वनस्पती
1. लिव्हिंग रूमसाठी सर्वोत्तम वनस्पती
लिव्हिंग रूम ही घराची सर्वात मोठी आणि मोकळी जागा असते, जिथे हवा आणि सूर्यप्रकाश चांगला येतो. इथे अशी झाडे लावा जी दिसायला सुंदर असतील आणि हवाही स्वच्छ करतील.
रबर प्लांट : याच्या गडद हिरव्या पानांमुळे लिव्हिंग रूमला एक आकर्षक लुक मिळतो आणि ते हवेतील विषारी घटक शोषून घेतात.
स्नेक प्लांट : हे कमी प्रकाशातही तग धरते आणि हवेतील कार्बन डायऑक्साइड आणि इतर वायू काढून टाकते.
सुपारीचं झाड: हे हवेतील आर्द्रता टिकवून ठेवते आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते.
2. बाथरूमसाठी परफेक्ट वनस्पती
बाथरूममध्ये आर्द्रता जास्त असते, त्यामुळे इथे अशी झाडे लावा जी ओल्या वातावरणात वाढतात.
स्पायडर प्लांट: हे दमट वातावरणात खूप वेगाने वाढते आणि बाथरूमची हवा स्वच्छ ठेवते.
मनी प्लांट: हे पाणी आणि कमी प्रकाशातही चांगले वाढते.
बोस्टन फर्न: याला आर्द्रता खूप आवडते आणि ते बाथरूमच्या कोपऱ्यांना हिरवागार लुक देते.
3. किचनसाठी सर्वोत्तम वनस्पती
किचनमध्ये अशा वनस्पती लावा ज्या उपयुक्त असतील आणि कमी जागा व्यापतील.
तुळस: आरोग्यासाठी फायदेशीर आणि स्वयंपाकात वापरली जाणारी ही औषधी वनस्पती किचनसाठी उत्तम आहे.
पुदीना: याची ताजी पाने किचनमधील हवा ताजीतवानी ठेवतात.
सक्युलेंट: कमी पाणी लागणारी ही छोटी झाडे दिसायला सुंदर दिसतात.
4. बेडरूमसाठी शांत आणि आरामदायक वनस्पती
बेडरूम शांत आणि आरामदायी असावी लागते. त्यामुळे इथे लावलेली झाडेही या वातावरणाला पूरक असावीत.
कोरफड (Aloe Vera): त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असण्यासोबतच हे झाड रात्री ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते.
चमेली: चमेलीचा सुगंध मन शांत ठेवतो आणि शांत झोप लागण्यास मदत करतो.
स्नेक प्लांट: हे झाड रात्रीही ऑक्सिजन बाहेर सोडते, ज्यामुळे शांत झोप येते.
प्रत्येक खोलीची गरज आणि वातावरण वेगळं असतं, त्यामुळे योग्य वनस्पतीची निवड करणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे घर सुंदर दिसेल आणि वातावरणही ताजेतवाने राहील.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
