
आजकाल लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. यासाठी, ते त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देत आहेत. तसेच जेवणासंबंधी तर विविध ट्रेंड सुरु असतातच. त्यातील एक म्हणजे मीठ, साखर न खाणे. मिठाच्याबाबतीत मात्र अनेक गोष्टी पाळल्या जातात, जसं की काहीजण सैंधव मीठ वापरतात, तर काहीजण काळे मीठ तर काहीजण पांढरे मीठ वापरतात. विशेषतः वजन आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, लोक पांढऱ्या मीठाऐवजी काळे किंवा गुलाबी ज्याला पिंक सॉल्ट असंही म्हणतात. मग या तिन्ही मिठांपैकी नेमकं कोणतं मीठ आरोग्यासाठी चांगले असते.
तज्ज्ञ काय म्हणतात?
फिटनेस कोच सिद्धार्थ तिवारी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ते स्पष्ट करतात की, “आजकाल, निरोगी खाण्याच्या नावाखाली, लोक मीठाबद्दलही गोंधळलेले असतात. काही जण सैंधव मीठ चांगले मानतात तर काही जण काळे मीठ. दरम्यान, काही लोक पांढरे मीठ पूर्णपणे टाळत आहेत. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या सर्वांपैकी फक्त पांढरे मीठच सर्वोत्तम आहे.” फिटनेस प्रशिक्षकांच्या मते, नियमित वापरात येणारे पांढरे मीठ हा दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम पर्याय आहे आणि तो कधीही दैनंदिन आहारातून वगळू नये.
पांढऱ्या मिठामुळे काय होते?
यामागील कारण सांगताना सिद्धार्थ यांनी म्हटलं आहे की, “आयोडीन हे आपल्या शरीरासाठी एक अतिशय महत्त्वाचे खनिज आहे. ते थायरॉईड ग्रंथीचे योग्य कार्य, चयापचय आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्यक आहे. सैंधव मीठ आणि काळ्या मीठात आयोडीन खूप कमी किंवा अजिबात नसते. तथापि, 1 चमचा पांढरे मीठामधून जवळपास 100 % RDA आयोडीन शरीराला मिळते”
सोडियमचे प्रमाण
अनेक लोकांचा असा विश्वास आहे की सैंधव मीठ किंवा काळे मीठ यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते, म्हणून ते खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. तथापि, सत्य हे आहे की तिन्ही प्रकारच्या मीठांमध्ये सोडियमचे प्रमाण अंदाजे समान असते. म्हणून, तिन्ही मीठांचे सेवन केल्याने रक्तदाबावर समान परिणाम होतो.
हेवी मेटल्स
सिद्धार्थ यांनी असेही सांगितले आहे की, सैंधव मीठ किंवा काळ्या मीठातहेवी मेटल्सचे प्रमाण फारच कमी असू शकते, जे आरोग्यासाठी चांगले नाही. नियमित टेबल मीठ अधिक सुरक्षित असते कारण ते प्रक्रिया केलेले असते आणि त्यात हेवी मेटल्सचा धोका खूपच कमी असतो.
सैंधव मीठ आणि काळे मीठ यांचा उपयोग कशासाठी होतो?
तुम्ही चवीसाठी किंवा उपवास करताना कधीकधी सैंधव मीठ आणि काळे मीठ वापरू शकता. काळे मीठ पचनास मदत करते आणि चाट किंवा रायत्यामध्ये चांगले असते, परंतु या मिठाचा नियमित वापर पर्याय म्हणून चांगला नाही.
महत्त्वाची गोष्ट
मिठाचा प्रकार जितका महत्त्वाचा आहे तितकाच त्याचे प्रमाणही महत्त्वाचे आहे. जास्त मीठ, प्रकार कोणताही असो, आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. WHO च्या मते, दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ सेवन करणे चांगले. म्हणून, जास्त मीठ सेवन टाळा.