आता घरीच बनवा आंब्याचे चविष्ट लाडू, जाणून घ्या रेसीपी
आंबा खायला सर्वांनाच आवडत असतो. आंब्याची चव अप्रतिम असल्याने आम्रखंडापासून ते आंबा वडीपर्यंत सर्व काही बनवले जाते, पण तुम्ही कधी आंब्याचे लाडू खाल्ले आहेत का? चला तर मग आजच्या या लेखात आपण आंब्यापासून लाडू कसे बनवले जातात त्याची रेसिपी जाणून घेऊयात.

आंब्याची चव आणि त्यातील पौष्टिक मूल्य यामुळे आंब्याला फळांचा राजा म्हंटल जाते. तसेच आंब्याच्या हंगामाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतात. कारण आंब्याची चव ही अप्रतिम असते. आंब्यापासून अनेक प्रकारचे पेये आणि गोड पदार्थ बनवले जातात, त्यापैकी आम्रखंड सर्वात लोकप्रिय आहे. तसेच आंब्यापासून बनवलेले पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ले जातात. पण तुम्ही कधी आंब्याचे लाडू खाल्ले आहेत का? जर नसेल, तर या हंगामात तुम्ही हे लाडू नक्कीच बनवून खावेत आणि मुलांनाही खायला द्यावेत. हे लाडू बनवण्याची पद्धत त्यांच्या चवी इतकीच सोपी आहे.
आंब्याचे लाडू बनवल्यानंतर तुम्ही ते तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये सहज ठेवू शकता आणि संपूर्ण कुटुंबासह त्यांचा आस्वाद घेऊ शकता. हे लाडू इतके चविष्ट आहेत की कोणीही तुमची प्रशंसा करताना थकणार नाही. आंब्यामध्ये नैसर्गिक गोडवा आहे, त्यामुळे तुम्हाला लाडू बनवताना त्यात जास्त साखरेची गरज भासणार नाही, म्हणून हे लाडू आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही चांगले आहेत. चला तर मग या आंब्याच्या लाडूची रेसिपी जाणून घेऊयात.
आंब्याचे लाडू बनवण्याचे साहित्य
पिकलेले आंबे घ्या. तर यासाठी तुम्ही दसरी किंवा बॉम्बे आंबे घेऊ शकता किंवा कोणतेही गोड आंबे निवडू शकता.
एक मोठे किसलेले नारळ लागेल.
एक चमचा वेलची पावडर
1/4 कप दूध पावडर.
दोन चमचे साजूक तूप
दोन चमचे साखर
बारीक केलेले पिस्ता आणि काजू
आंबा लाडू रेसिपी
सर्वप्रथम, आंबा कापून त्याचा गर काढा आणि मिक्सरमध्ये टाका. त्यात साखर आणि वेलची टाकून मिश्रण बारीक करा. त्यानंतर यामध्ये बारीक किसलेला नारळ त्या मिश्रणात टाकून बारीक करा. आता एका पॅनमध्ये साजूक तुप टाकून आंबा आणि नारळाचे तयार मिश्रण काही वेळांसाठी परतवा. त्यानंतर आंब्याचा गर, दूध पावडर टाका. आता या मिश्रणातील ओलावा सुकेपर्यंत शिजवा. तसेच त्यात काही काजूचे तुकडे मिक्स करा.
असे लाडू बनवा
मिश्रण लाडू बनवण्याइतके घट्ट झाल्यावर थोडे थंड झाल्यावर, तुमच्या हातात थोडे मिश्रण घ्या आणि त्याला गोल आकार द्या. लाडूंवर किसलेले नारळ टाका आणि ते एका प्लेटमध्ये ठेवा त्यानंतर त्यावर पिस्ता आणि काजूने सजवा, तुमचे चविष्ट लाडू तयार आहेत.
