उन्हाळ्यात या पदार्थांच्या सेवनाने शरीरात उद्भवते डिहायड्रेशनची समस्या

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. मात्र आपण आपल्या दैनंदिन जीवनात असे काही पदार्थ खातो ज्यामुळे डिहायड्रेशन होते. उन्हाळ्यात डिहायड्रेशन होण्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या पदार्थांबद्दल जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात या पदार्थांच्या सेवनाने शरीरात उद्भवते डिहायड्रेशनची समस्या
Dehydration
Image Credit source: Getty Images
| Edited By: | Updated on: Mar 14, 2026 | 3:27 AM

मार्चमध्ये उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे या उष्णतेपासून आरोग्य नीट राखण्यासाठी प्रत्येकजण आहारात थंड पदार्थांचे सेवन करत आहेत. कारण या ऋतूमध्ये शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. जर डिहायड्रेशन झाले आणि त्यावर नियंत्रणात आले नाही तर व्यक्ती रुग्णालयात दाखल होऊ शकते. यासाठी आहारात काकडी, टोमॅटो आणि अशा इतर पदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ते खाण्याची शिफारस केली जाते. मात्र काहीजण या दिवसात अशी फळं आणि पदार्थ खातात ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

तर असे काही पदार्थ खाण्यास चविष्ट असले तरी त्यांच्या सेवनाने शरीरातील पाणी कमी होते किंवा त्यांना पचण्यासाठी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करणे टाळणे महत्वाचे आहे ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात. तसेच तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही कोणते पदार्थ खावेत हे देखील जाणून घेऊयात.

पाणी का महत्वाचे आहे? पाणी पिण्याच्या टिप्स

शरीरात अंदाजे 70% पाणी असते. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त घाम येतो म्हणून पाण्याची पातळी निरोगी ठेवण्याची शिफारस केली जाते. जास्त उष्माघातामुळे उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. अशा परिस्थितीत डिहायड्रेशन ही आणखी मोठी समस्या बनू शकते.

शरीरात डिहायड्रेशन वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन टाळा

कॅफिनयुक्त पदार्थ – कॅफिन हे ड्युरेटिक असते ज्यामुळे तुम्ही जेव्हा कॅफिनयुक्त पदार्थ सेवन करता तेव्हा तुम्हाला वारंवार लघवी येऊ शकते. तज्ञांचे म्हणणे आहे की यामुळे शरीरातील पाणी लवकर कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित करा, कारण त्यात कॅफिन असते. काही लोकांसाठी चहा आणि कॉफी टाळणे कठीण असू शकते, परंतु ते कमी प्रमाणात सेवन करणे चांगले.

उच्च प्रथिनेयुक्त आहार – प्रथिने हा आपल्या शरीरासाठी एक आवश्यक घटक आहे. चीज, डाळी किंवा इतर प्रथिनेयुक्त पदार्थ सेवन केल्यास ते पचण्यास खूप वेळ घेतात. तज्ञांचे म्हणणे आहे की व्यायामासोबतच प्रथिने पचण्यासाठी भरपूर पाणी आवश्यक असते. जर तुम्ही जिममध्ये गेलात व्यायाम केलात किंवा शारीरिक हालचाली केल्या आणि प्रथिनेयुक्त आहार घेतला तर भरपूर पाणी प्या.

नमकीन स्नॅक्स – अनेक नमकीनस्नॅक्समध्ये विविध घटकांचा वापर करून त्यांची शेल्फ लाइफ वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील पाण्याच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. शेंगदाणे आणि इतर स्नॅक्स खाल्ल्याने तहान जास्त प्रमाणात लागते. उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे टाळावेत. तळलेले पदार्थ देखील समस्या निर्माण करू शकतात, कारण ते पचण्यास कठीण असतात, यामुळे शरीरावर अतिरिक्त दबाव येतो आणि डिहायड्रेशन होते.

रिफाइंड मैद्याचे पदार्थ – रिफाइंड पीठ आजही भारतीय आहारात एक प्रमुख घटक आहे. मात्र त्यात फायबरची कमतरता असते आणि यापासून तयार केलेले पदार्थ पचण्यास खूप कठीण असते. मैद्याचे पीठ हा असा प्रकार आहे ज्याला पचण्यासाठी सर्वात जास्त पाणी लागते. पिझ्झा खाल्ल्यानंतर काही लोकांना तीव्र तहान लागते. मैद्याचे पीठ आतड्यांमध्ये अडकते आणि फॅटी लिव्हरच्या समस्यांना कारणीभूत ठरते.

याव्यतिरिक्त लाल मांस, प्रक्रिया केलेले अन्न, आणि तळलेले अन्न देखील डिहायड्रेशनला कारणीभूत ठरतात. हे पदार्थ शरीराला जलद डिहायड्रेट करतात. योग्य हायड्रेशन राखण्यासाठी फक्त पाणी पिणे पुरेसे नाही. काकडी, टोमॅटो आणि इतर भाज्या ज्यामध्ये जास्त पाण्याचे प्रमाण असते ते पदार्थ खा. याव्यतिरिक्त, दररोज नारळ पाणी प्या.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us