
पती-पत्नी यांच्या संसारात भांड्याला भांडे तर लागत असते. परंतू नाते तुटेपर्यंत कधी ताणायचे नसते, कधी पत्नीने तर कधी पतीने माघार घ्यायची असते. परंतू आजकाल घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. यात किरकोळ कारणावरुनही घटस्फोट होत आहेत. नवविवाहित दाम्पत्यात आता कोणत्याही कारणाने वितुष्ट येत आहे. यात चपातीला आकार नाही, चहा नीट बनवत नाही, मेकअपचा खर्च तसेच माहेरुन डॉगी आणणे या छोट्या कारणांनी पोलिसांत तक्रारी होत आहेत.मात्र, या नवदाम्पत्यांचे काऊन्सिलिंग करुन त्यांच्यातील भांडणे मिटवली जात आहेत.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हैर येथील परिवार परामर्श केंद्राचे काऊन्सिलर महेंद्र शुक्ला यांनी सांगितले की छोट्या-छोट्या गोष्टीवरुन नवविवाहित जोडपी भांडत आहेत. ग्वाल्हैर पोलिस ठाण्यात वैवाहिक जोडपी साध्या कारणाने देखील तलाक घेण्यासाठी पोहचत असतात. त्यांच्यातील भांडणाची कारणे इतकी शुल्लक असतात की ती पाहून हसावे की रडावे हे समजत नाही.
ग्वाल्हैरच्या महिला पोलिस अधिकारी रश्मी भदौरिया यांनी सांगितले की दाम्पत्यात छोट्या कारणांनी भांडणे होतात. त्यामुळे पोलिस ठाण्यात घरगुती हिंसा आणि मानसिक छळाच्या तक्रारी दरवर्षी वाढत आहेत. २०२२ साली महिला पोलिस ठाण्यात कौटुंबिक वादाची १४९९ केस दाखल झाल्या आहेत. तसेच २०२५ मध्ये २२५० केस दाखल झाल्या आहेत. यातील १६०० प्रकरणात काऊन्सिलिंग आणि दोघांची समजूत घालून मिटवण्यात आले आहेत. तर ६५० प्रकरणे कोर्टात घटस्फोट किंवा एफआयआर पर्यंत पोहचली आहेत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पती-पत्नी यांच्या भांडणामुळे नाते तुटण्याच्या मार्गावर आहेत. परंतू काऊन्सिलिंग टेबलावर बसल्यानंतर दाम्पत्यांनी एकमेकांच्या तक्रारी ऐकल्या आणि नंतर त्यांच्यातील गैरसमज मिटले. महिलांनी पुढाकार घेत अनेक अडचणीनंतरही नाते वाचवण्याचा निर्णय घेतला. तसेच पुरुषांनी देखील बदलाची जबाबदारी स्वीकारल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.