माणूस गरजेपेक्षा जास्त का खातो? यामागचं विज्ञान जाणून घ्या

खाणं ही माणसाची मूलभूत गरज आहे, पण बऱ्याच वेळा माणूस आपल्या गरजेपेक्षा जास्त खायला लागतो. मग असा प्रश्न निर्माण होतो की, खरंच आपल्या शरीराला इतकं अन्न लागते का? की आपण सवयींमुळे, भावनिक स्थितीमुळे किंवा चविष्ट अन्नामुळे अनावश्यक खाण्याकडे वळतो? तर असं का होतं, हे नक्की वाचा आणि योग्य काळजी घ्या.

माणूस गरजेपेक्षा जास्त का खातो? यामागचं विज्ञान जाणून घ्या
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 14, 2025 | 7:32 PM

आपण सगळेच खाणं हे जीवनाचं महत्त्वाचं अंग मानतो. शरीर चालण्यासाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी अन्न गरजेचं आहेच. पण कधी कधी काही लोक चवीनं, तर कधी सवयीमुळे गरजेपेक्षा जास्त खातात ज्याला ‘ओव्हरईटिंग’ म्हणतात. आता प्रश्न असा की हे ओव्हरईटिंग होतं तरी का? त्यामागे नक्की काय विज्ञान दडलं आहे? चला, जाणून घेऊया.

शरीराची गरज की मेंदूचा सिग्नल?

आपण खाणं हे शरीराची पोषणाची गरज समजून करतो, पण प्रत्यक्षात खाण्याचा आणि आपल्या मेंदूचा खूप जवळचा संबंध असतो. चविष्ट जेवण पाहिलं की मेंदूमध्ये आनंद देणारा ‘डोपामाइन’ नावाचा हार्मोन झपाट्यानं वाढतो. यामुळे खाणं आपल्याला भावतं आणि आपण अधिक खाऊ लागतो.

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी चाचणीमध्ये असं पाहिलं की जास्त फॅट असलेल्या पदार्थांनी MMP-2 नावाचं एन्झाइम मेंदूत तयार होतं. हे एन्झाइम मेंदूतील ‘हायपोथॅलॅमस’ भागात ‘लेप्टिन’ या हार्मोनला अडवतो. लेप्टिन हे आपल्याला “आता पोट भरलं आहे” हे सांगतं. पण जेव्हा यावर परिणाम होतो, तेव्हा मेंदूला चुकीचा सिग्नल मिळतो आणि आपण खाणं थांबवत नाही.

चविष्ट जेवण पुढ्यात आलं की लोक पटकन, भराभर खायला सुरुवात करतात. तेव्हा ते अन्नासोबत हवाही गिळतात ज्यामुळे उचक्या आणि ढेकर योण्याचा त्रास होऊ शकतो. शिवाय, झपाट्यानं खाल्ल्यानं मेंदूला पोट भरल्याचं लक्षात येण्याआधीच आपण जास्त खाऊन घेतो.

ओव्हरईटिंगचे दुष्परिणाम

जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त खातो, तेव्हा अन्न पचवण्यासाठी शरीरावर अधिक ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे आपण खाल्ल्यानंतर थकल्यासारखं वाटायला लागतं. सततचं ओव्हरईटिंग हे वजन वाढवणारं, पचन बिघडवणारं आणि मानसिक तणावाचं कारण ठरू शकतं.

उपाय काय?

1. हळू-हळू खा

2. ताटात जितकी गरज आहे तितकंच घ्या.

3. जेवताना मोबाईल किंवा टीव्ही पाहणं टाळा, यामुळे आपण किती खातो हे लक्षात राहत नाही.

4. क्रेव्हिंग्स आली तरी थांबा, पाणी प्या किंवा थोडा वेळ थांबा.

एकांदरीत काय, गरजेपेक्षा जास्त खाणं हे शारीरिकच नाही तर मानसिक पातळीवरही परिणाम करतं. त्यामुळे चवीनं खाणं ठीक, पण स्वतःच्या शरीराचं ऐकणंही तितकंच गरजेचं आहे. योग्य प्रमाणात, संतुलित आणि शहाणपणानं खाल्लं तरच खरं आरोग्य लाभेल.

ओव्हरईटिंग होऊ नये म्हणून अशा गोष्टी खा ज्या पोट लगेच भरतात आणि पोषकही ठरतात. त्यासाठी भरपूर फायबर आणि प्रोटीन असलेले अन्न निवडा जसं की मूग डाळ, हरभरा, उकडलेली अंडी, दूध, दही, भाज्यांचा सूप, सुकामेवा (विशेषतः बदाम, अक्रोड) आणि संपूर्ण धान्यांपासून बनवलेली पोळी किंवा भाकरी. भिजवलेले चणे, फ्रूट सलाड, स्टीम केलेले स्प्राऊट्स हेही चांगले पर्याय आहेत. हे पदार्थ केवळ पोट भरण्यास मदत करत नाहीत, तर शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण देतात. यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि जास्त खाण्याची सवयही कमी होते. ओव्हरईटिंग टाळण्यासाठी दिवसभरात छोट्या पण संतुलित आहाराचे वेळापत्रक पाळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.