बायकोला, आईला कसं भेटायचं..? दिवाळीच्या तोंडावर विमानाच्या तिकीटाचा भाव गगनाला, किंमत ऐकूनच…
दिवाळीसाठी मायदेशी येणाऱ्या भारतीयांचा खिसा मोठ्य़ा प्रमाणात रिकामा होण्याची शक्यता आहे. विमान तिकीटांचा भाव गगनाला भिडला असून काही मार्गांवरील दर तर 300% वाढले आहेत. काय आहे कारण ?

गणेशोत्सव संपत आला असून आता थोड्याच दिवसात घट बसतील, नवरात्र -दसरा होताच बघता बघा दिवाळीचा सणही समोर येऊन ठेपेल. सणा-सुदीला घरच्यांसोबत राहण्याची, एकत्र सण साजरा करण्याची प्रत्येकाला इच्छा असते. परदेशात राहणारे अनेक भारतीय देखील मायदेशी येत असतात. मात्र यंदा घरी परत येणाऱ्या भारतीयांना मोठा आर्थिक झटका बसू शकतो. या सणासुदीच्या काळात विमान प्रवास चांगलाच महाग झाला असून खिशाला मोठा भुर्दंड पडणार आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय दोन्ही विमानांच्या तिकिटांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काही मार्गांवर तर तिकिटांचे दर तर 300 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. देशांतर्गत प्रवासापासून ते आंतरराष्ट्रीय विमानसेवेपर्यंत सर्वत्र भाडेवाढ झाली आहे. याबाबत सोशल मीडियावरही लोक मतं व्यक्त करत आहेत. विमानांच्या तिकिटांच्या दरात किती वाढ झाली आणि त्यामागचं नेमकं कारणं काय ?
विमान भाड्यात मोठी वाढ
गल्फ न्यूजचा 20 सप्टेंबरच्या रिपोर्टनुसार, अबू धाबी आणि शारजाह येथून दिल्लीला 5 नोव्हेंबर रोजी जाणाऱ्या विमानांच्या तिकीटाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दुबईहून दिल्लीला जाण्यासाठी इंडिगोचे भाडे 1214 दिरहम्सपासून सुरू होतं, तर एअर इंडियाचे तिकीट हे 1,115 दिरहम्स आणि स्पाइसजेच्या तिकीटासाठी 1,013 दिरहम मोजावे लागत आहेत. शारजाहहून दिल्लीसाठी इंडिगोचे भाडे 1,034 दिरहम, एअर इंडियाचं भाडं 1,695 दिरहम, तर एअर इंडिया एक्सप्रेसचे भाडं हे तब्बल 1,883 दिरहम असल्याचं सांगण्यात आलं आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे दर गगनाला
कच्च्या तेलाच्या जागतिक किमतींमध्ये झालेली वाढ हे या सप्टेंबरमध्ये विमानांचे भाडे महागण्यामागचं प्रमुख कारण आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. बिझनेस इनसायडरनुसार, सुट्टीच्या काळात आपल्या विमानफेऱ्यांची संख्या कमी करत असल्याचं अमेरिकेतील युनायडेट एअरलाइन्स आणि साउथवेस्ट एअरलाइन्स यासह अनेक मोठ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. वाढत्या इंधन खर्चाची भरपाई करण्यासाठी विमान तिकीटाच्या दरात मोठी वाढ होऊ शकते.
यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. X वर Arnav_807 नावाच्या एका यूजरने 19 सप्टेंबर रोजी पोस्ट लिहीली होती. “ थपथ घेऊन सांगतो, दोन वर्षांपूर्वी दिल्ली-बेंगळुरूचे दिवाळीतील राउंड ट्रिप तिकीट सुमारे 13 हजार रुपयांना मिळायचे. आता ते सहज 20 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. असं काय झालंय ? ” असा सवाल त्याने विचारला आहे. अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या असून वाढत्या दरांमुळे सगळेच हैराण झालेत.
पैसे कसे वाचवाल ?
ट्रॅव्हल सर्च अॅग्रीगेटर स्कायस्कॅनरने काही उपयुक्त टिप्स दिल्या आहेत, ज्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते. पहिलं म्हणजे, आपल्या आवडत्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि तिकिटांच्या किमती कमी झाल्यावर सूचना मिळवण्यासाठी प्राइस अलर्टचा वापर करा.
दुसरं म्हणजे दिवाळीच्या आधी प्रवास करण्यपेक्षा दिवाळीच्या दिवशी प्रवास करणं हे तुलनेत स्वस्त ठरू शकते, कारण त्या काळात मागणी सर्वाधिक असते. वीकेंडपेक्षाही आठवड्याच्या मधल्या दिवसांमध्ये विमानांची तिकिटं तुलनेने स्वस्त मिळू शकतात. तसेच छोट्या देशांतर्गत प्रवासासाठी केवळ केबिन बॅगेजसह प्रवास केल्यास खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते. घरी जाण्याचं आणि परत येण्याचं, अशी दोन्ही प्रवासाची तिकीटं एकाच वेळी बुक केली चांगली किंमत मिळू शकते आणि जास्तीचा खर्च वाचू शकतो.