मोठी बातमी! शायना एनसींच्या कानाखाली मारा, 71 हजार घेऊन जा, ठाकरे सेनेचा फतवा
शिंदे सेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याने राज्यात गदारोळ सुरू आहे. ठाकरे सेनेने या घटनेचा तीव्र निषेध करत, शायना एनसी यांच्या कानाखाली मारणाऱ्याला 71 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पिंपरी चिंचवडमधून हा फतवा काढण्यात आला असून, राज्यभर ठाकरे सेनेचे जोरदार आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाचा निषेध नोंदवत असतानाच शिंदे सेनेच्या नेत्या शायना एनसी यांच्याकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला. त्यामुळे राज्यभरात गदारोळ उडाला आहे. ठाकरे सेनेकडून शायना एनसी यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानंतर शायना एनसी यांनी माफी मागितल्यावरही हा वाद काही संपताना दिसत नाहीये. आता तर ठाकरे सेनेकडून एक फतवाच काढण्यात आला आहे. शायना एनसी यांच्या कानाखाली मारणाऱ्याला ठाकरे सेनेकडून 71 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
ठाकरे सेनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष चेतन पवार यांनी हा फतवा जारी केला आहे. शायना एनसी यांच्या कानाखाली मारणाऱ्याला 71 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचं चेतन पवार यांनी म्हटलं आहे. चेतन पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या घटनेचा निषेधही त्यांनी नोंदवला आहे.
यवतमाळमध्ये ठाकरे सेना आक्रमक
यवतमाळच्या आर्णीमध्येही फोटो प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. ठाकरे सेना आणि मनसेने शिंदे सेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्या विरोधात आंदोलन केलं आहे. या आंदोलकांनी शायना एनसी यांच्या प्रतिमेवर श्वानाची विष्ठा टाकून निषेध नोंदवला आहे. ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आलं आहे.
गुन्हा दाखल करा
बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या प्रकरणावरून कल्याणमध्ये ठाकरे गटाने आज जोरदार आंदोलन केलं. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांचा निषेध करत आंदोलकांनी शायना एनसी यांच्या फोटोला काळं फासलं. त्यांचा फोटोही जाळला. शिंदे सेनेला बाळासाहेबांबद्दल आस्था नाही. त्यांनी जाहीर माफी मागावी. शायना एनसी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या आंदोलकांनी केली. ठाकरे सेनेचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन झालं.
नाक घासून माफी मागा
जळगावमध्येही या प्रकरणाचे पडसाद उमटले. ठाकरे गटाच्या महिला आघाडीने निषेध आंदोलन केलं. शायना एनसी यांच्या प्रतिमेला जोडे मारून यावेळी निषेध नोंदवण्यात आला. शायना एनसी यांची पक्षातून हकालपट्टी करा आणि बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाऊन नाक घासून माफी मागा, अशी मागणीच आंदोलकांनी केली आहे.
