Woman’s life : प्रत्येक महिलेच्या बॅगेत ‘या’ अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असायलाच हव्यात
Woman's life : महिलांनी घराबाहेर पडताना काही गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. अशात महिलांच्या बॅगेत कोणत्या वस्तू असायला हव्यात... याबद्दल जाणून घ्या. फिरायला, ऑफिस, कॉलेज किंवा शाळेत जाणाऱ्या मुली, महिलांच्या बॅगेत काही महत्त्वाच्या गोष्टी असायलाच हव्यात.

Woman’s life : आजची परिस्थिती पाहिली तर, देशात कोणत्याच कोपऱ्यात महिला सुरक्षित नाहीत आणि अनोळख्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवणं देखील योग्य नाही. त्यामुळे महिलांना स्वतःची काळजी आणि रक्षा स्वतःच करायला हवी… सांगायचं झालं तर, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. अशा घटना वारंवार घडतच आहेत. त्यामुळे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी महिलांनी आपल्या बॅगेत नेहमी काही सुरक्षा उपकरणं ठेवली पाहिजेत. ही छोटी सुरक्षा उपकरणं प्रत्येक स्त्रीला मोठ्या संकटातूनही बाहेर पडण्यास मदत करतात. त्यामुळे, प्रत्येक स्त्रीने मेकअपच्या वस्तूंऐवजी या काही वस्तू आपल्या बॅगेत ठेवल्या पाहिजेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, महिलांनी आपल्या बॅगेत नेहमी पेपर स्प्रे ठेवावा. रस्त्यावर एकट्याच चालत असताना जर कोणी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, तुमच्याशी गैरवर्तन केलं किंवा तुमचा छळ केला, तर ताबडतोब आपल्या बॅगेतून पेपर स्प्रे काढून त्यांच्या डोळ्यात फवारा. असं केल्यानं, तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःचं मोठ्या संकटापासून संरक्षण करू शकता.
एकट्याने किंवा रात्री प्रवास करणाऱ्या महिलांनी आपल्या बॅगेत एक सुरक्षा अलार्म किंवा मोठी शिट्टी नक्कीच ठेवावी. आजकाल बाजारात असे अनेक छोटे अलार्म मिळतात, ज्यांचं बटण दाबल्यावर मोठा आवाज येतो. जर तुमच्याकडे असा अलार्म नसेल, तर तुम्ही तुमच्या बॅगेत एक शिट्टी ठेवू शकता. जेव्हा तुम्ही धोक्यात असाल, तेव्हा अलार्म दाबून तुम्ही मदतीसाठी कोणालातरी बोलावू शकता.
कधीकधी, लांबच्या प्रवासात स्मार्टफोनची बॅटरी संपते, अशात जर फोनची बॅटरी संपली, तर पोलिसांना किंवा कुटुंबातील सदस्यांना फोन करणं शक्य होणार नाही. म्हणून, घरातून बाहेर पडताना आपल्या बॅगेत एक पॉवर बँक ठेवा आणि फोनची चार्जिंग संपणार नाही याची खात्री करा. अशा प्रकारे, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना त्वरित फोन करू शकता, तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करू शकता आणि समस्या उद्भवल्यास पोलिसांनाही बोलावू शकता.
जेव्हा तुम्ही अडचणीत असता, तेव्हा अगदी लहानशी गोष्टही तुमच्या मदतीला येऊ शकतं. म्हणून तुमच्या बॅगेत नेहमी एक छोटा चाकू आणि एक सेफ्टी पिन ठेवा. जर कोणी तुमचा पाठलाग करत असेल किंवा तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही चाकूच्या मदतीने स्वतःचं संरक्षण करू शकता.
रात्री बाहेर जाताना, तुम्ही तुमच्या बॅगेत एक लहान टॉर्च ठेवावा. यामुळे तुम्हाला अंधारात मार्ग तर मिळेलच, पण जर कोणी तुमचा पाठलाग करत असेल, तर तुम्ही त्यांना गोंधळात टाकण्यासाठी त्यांच्या डोळ्यांवर टॉर्चचा प्रकाशही टाकू शकता.
