चहाप्रेमी चहा पिताना करतात ‘या’ 5 सामान्य चुका, जाणून घ्या

भारतात चहाचे स्वत:चे वेगळे महत्व आहे. चहा प्रेमींसाठी चहाचे एक खास स्थान आहे. पण हेच चहाप्रेमी रोज चहा पिताना मात्र या सामान्य चुका करतात, ज्या त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तर आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात की चहा पिताना कोणत्या चुका करू नये.

चहाप्रेमी चहा पिताना करतात या 5 सामान्य चुका, जाणून घ्या
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 23, 2025 | 10:33 AM

बहुतेक लोकांना जोडणारी एखादी गोष्ट असेल तर ती म्हणजे चहा. सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळचा थकवा, मित्रांसोबत गप्पा असो किंवा एकांतातला शांत क्षण असो, चहा प्रत्येक प्रसंगी आपल्यासोबत असतो. बऱ्याच लोकांसाठी चहा हे फक्त एक पेय नाही तर एक भावना आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण दररोज जो चहा आवडीने पितो त्यात केलेल्या काही सामान्य चुका आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात?

हो, चहाचे व्यसन लागणे आणि ते योग्यरित्या न पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. मग ते चहा खूप वेळा पिणे असो, रिकाम्या पोटी पिणे असो किंवा चहा बनवताना त्यात जास्त चहाचे मसाले टाकणे असो. या सवयी हळूहळू तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवू शकतात. जर तुम्हीही चहाचे शौकीन असाल तर या लेखात आपण जाणून घेऊयात की तुम्हीही चहा पिताना त्या 5 सामान्य चुका करत आहात का?

चहा पिताना होणाऱ्या 5 चुका

1. रिकाम्या पोटी चहा पिणे

काही लोकं सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी चहा पितात, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कारण रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. याशिवाय, यामुळे गॅस, जळजळ आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून चहा पिण्यापूर्वी कोमट पाणी प्या किंवा काही फळांचे सेवन करा.

2. जास्त चहा पिणे

आपल्यापैकी असे बरेचजण खूप चहाप्रेमी आहेत जे दिवसातून 4-5 वेळा किंवा त्याहून अधिक वेळा चहा पितात. पण हाच चहा तुमच्या शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढते. यामुळे झोपेचा अभाव, चिंता आणि थकवा येऊ शकतो. म्हणून, दिवसातून 2 कपापेक्षा जास्त चहा पिऊ नका आणि रात्री उशिरा चहा पिणे टाळा.

3. खूप कडक किंवा उकळलेला चहा पिणे

काही लोकं चहाला सुगंध येण्यासाठी आणि त्याची चव वाढवण्यासाठी 10-15 मिनिटे उकळवतात, ज्यामुळे त्यात असलेले टॅनिन आणि कॅफिन वाढते. हे पचनसंस्थेवर परिणाम करू शकतात. अशा परिस्थितीत चहा हलका उकळवा आणि तो जास्त वेळा उकळवू नका.

4. जेवणानंतर लगेच चहा पिणे

काही लोकांना जेवणानंतर चहा पिण्याची सवय असते, जी त्यांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगली नसते. जेवणानंतर लगेच चहा प्यायल्याने अन्नातील लोह आणि पोषक तत्वांचे शोषण कमी होते. जर तुम्हाला चहा प्यायचा असेल तर जेवणानंतर 30- 45 मिनिटांनीच प्या.

5. साखरेचे प्रमाण जास्त असणे

काही लोकांना गोड चहा प्यायला खूप आवडतो. अशावेळेस बहुतेजण चहा बनवताना आवश्यकतेपेक्षा जास्त साखर टाकतात. पण जास्त गोड चहामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. तसेच लठ्ठपणा आणि मधुमेहाची समस्या निर्माण होऊ शकते. शक्य असल्यास चहामध्ये साखर कमी टाका किंवा गूळ, मध सारखे पर्यायांचा अवलंब करा.