Remove tea stains: चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, वाचेल तुमचा वेळ
Remove tea stains: किचनमधील सर्वात कठीण काम म्हणजे चहाची गाळणी साफ करणं... चहाची गाळणी साफ करायला फार वेळ लागतो. पण काही टिप्स वापरल्यानंतर तुमचा वेळ वाचेल...

भारतीय घरांमध्ये चहा हा रोजच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, दररोज चहा बनवल्यानंतर गाळणी व्यवस्थित स्वच्छ न केल्यास तिच्या जाळीवर चहाच्या पानांमधील टॅनिन, धूळ आणि तेलकट अवशेष जमा होतात. त्यामुळे गाळणीची छिद्रे बंद होतात आणि चहा गाळताना अडचणी निर्माण होतात. एवढेच नाही, तर ओलसर आणि अस्वच्छ गाळणीवर जिवाणूंची वाढ होण्याची शक्यताही असते. अशा वेळी काही सोप्या घरगुती उपायांनी गाळणी पुन्हा स्वच्छ करता येते.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करुन तुम्ही चाहची गाळणी साफ करु शकता. एका भांड्यात समान प्रमाणात बेकिंग सोडा आणि पांढरा व्हिनेगर घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट गाळणीवर लावून काही वेळ ठेवा. त्यानंतर मऊ ब्रशने हलक्या हाताने घासून स्वच्छ पाण्याने धुवा.
उकळत्या पाण्याचा उपाय देखील प्रभावी ठरेल. स्टीलच्या गाळणीवर जाड थर जमा झाला असल्यास एका भांड्यात पाणी आणि एक चमचा बेकिंग सोडा घालून गाळणी सुमारे दहा मिनिटे उकळा. यामुळे अडकलेले चहाचे कण आणि तेलकट अवशेष सैल होण्यास मदत होते.
लिंबामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड काळे आणि तपकिरी डाग कमी करण्यास मदत करते. अर्ध्या लिंबाचा रस गाळणीवर लावून काही वेळ ठेवा. नंतर ब्रशने घासून धुवा. डिशवॉश लिक्विडचा वापर देखील करु शकता. कोमट पाण्यात डिशवॉश लिक्विड मिसळून गाळणी १५ ते २० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर जुन्या टूथब्रशने जाळी स्वच्छ करा.
जाळीच्या कोपऱ्यांमध्ये साचलेली घाण काढण्यासाठी थोड्या द्रव साबणात मीठ मिसळून हलक्या हाताने घासावे. मात्र, जाळी खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.प्लास्टिकच्या गाळणीला उकळत्या पाण्याचा वापर करू नये. त्याऐवजी कोमट पाणी, व्हिनेगर किंवा लिंबाचा रस वापरावा.
दररोज चहा गाळल्यानंतर गाळणी लगेच साध्या पाण्याने धुणे ही सर्वांत महत्त्वाची सवय आहे. नियमित स्वच्छतेमुळे गाळणीवरील डाग आणि घाण साचण्यास प्रतिबंध होतो तसेच तिचे आयुष्यही वाढते.