लंचसाठी शोधताय काहीतरी वेगळं? एकदा नक्की ट्राय करा ‘पालक लसूणी’ची सोपी रेसिपी
दुपारच्या जेवणात रोज तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळं करून पाहा. पालक आणि लसूण यांच्या खास चवीने तयार होणारी 'पालक लसूनी' भाजी चवीला अप्रतिम लागते. जाणून घ्या, ही भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.

पालक म्हटलं की अनेक जण, विशेषतः लहान मुलं, खाण्यासाठी नाक मुरडतात. पालक आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी त्याची भाजी रोज खाण्याचा अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे पालकाचा आहारात समावेश करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पालकाची डाळ, पालक पनीर, आलू पालक किंवा पालकाचे रायते असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, या नेहमीच्या पदार्थांपेक्षा काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवायचं असेल, तर पालक लसूनी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पालक आणि लसूण यांचा छान कॉम्बिनेशन असलेली ही भाजी चवीला अतिशय रुचकर लागते. विशेष म्हणजे, ती बनवण्यासाठी जास्त वेळ किंवा फार मेहनत घ्यावी लागत नाही. रोजच्या जेवणात बदल हवा असेल, तर लंचसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. चला तर मग, जाणून घेऊया चविष्ट पालक लसूणी बनवण्याची सोपी पद्धत.
पालक लसूणी बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे…
– ताजे पालक
– भाजलेले शेंगदाणे
– भाजलेली हरभरा डाळ
– कांदा
– टोमॅटो
– लसूण
– संपूर्ण लाल मिरची
– लाल तिखट
– हळद
– धने पावडर
– तेल
– मीठ
पालक लसूणी बनवण्याची कृती
सर्वप्रथम शेंगदाणे आणि हरभरा डाळ हलके भाजून घ्या. ते थंड झाल्यानंतर ग्राइंडरमध्ये बारीक करून त्यात थोडे पाणी मिसळा आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा. आता पालकाची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.
कढईत थोडे तेल गरम करून त्यात चिरलेला लसूण घाला. तो हलका परतल्यानंतर त्यात चिरलेला पालक आणि चवीनुसार मीठ घालून शिजवून घ्या. पालकातील पाणी आटल्यावर तो कढईतून बाहेर काढा. आता त्याच कढईत पुन्हा तेल गरम करून त्यात संपूर्ण लाल मिरची आणि जिरे घाला. जिरे तडतडल्यावर चिरलेला कांदा आणि थोडासा लसूण घालून परता. कांदा सोनेरी झाल्यावर त्यात टोमॅटो, हळद, धने पावडर आणि थोडे मीठ घालून मसाला चांगला शिजवून घ्या.
तयार मसाल्यात शेंगदाणे आणि हरभरा डाळीची पेस्ट घालून व्यवस्थित मिसळा. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून झाकण ठेवून शिजवा. पेस्ट शिजल्यावर त्यात परतून घेतलेला पालक घालून सर्व मिश्रण एकजीव करा आणि आणखी काही वेळ शिजू द्या. भाजीतील तेल वेगळे दिसू लागल्यावर पालक लसूनी तयार आहे. गरमागरम भाजी पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा.