
आपल्यापैकी अनेकांना निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जायला आवडते. तर काहींना समुद्रकिनाऱ्यावर शांततेत वेळ घालवायला आवडते. निळ्या समुद्राचे, सोनेरी वाळूचे, थंड वाऱ्याचा आणि आरामदायी क्षणांचे फोटो आठवण म्हणून काढतात.कुटुंब किंवा मित्रांसोबत बीचवर घालवलेला वेळ नेहमीच खास असतो. खरं तर बीचवरील आठवण सोबत राहावी यासाठी तेथील वाळू काचेच्या बाटलीत भरून घरी घेऊन जातात. तर अनेक ठिकाणी बीचवरील काही गोष्टी घरी आणणे हे गुन्हा देखील मानला जातो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर सहलीला जाल तेव्हा कधीही या पाच वस्तू तुमच्यासोबत आणून नका. चला तर मग याबद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.
बीचवर फिरायला गेल्यावर घरी कोणत्या गोष्टी आणू नयेत?
1. वाळू
बरेच लोकं समुद्रकिनाऱ्यावरील वाळू बाटल्या किंवा कॅनमध्ये घरी आणतात. पण खरंतर वाळू ही समुद्रकिनाऱ्यावरील इकोसिस्टमचा एक महत्त्वाचा भाग आहे. वाळू किनाऱ्याचे धूप होण्यापासून संरक्षण करते आणि अनेक लहान प्राण्यांचे घर आहे. सतत वाळू उपसल्याने समुद्रकिनारा हळूहळू आकुंचन पावतो. त्यामुळे निसर्गाच्या या गोष्टींचे जतन करावे.
2. शंख आणि शिंपले
बीचवर अनेक सुंदर शंख आणि शिंपले असतात, आणि ते पाहताच आपल्यापैकी सर्वांनाच उचलण्याचा मोह होतो, परंतु ते सागरी जीवनासाठी महत्त्वाचे आहेत. तर हे शंख शिंपले अनेकदा समुद्रकिनाऱ्यावरील लहान जिवांना आश्रय देतात किंवा तुटल्यावर समुद्रतळाचे संतुलन राखतात. त्यांना काढून टाकल्याने सागरी जैवविविधतेवर परिणाम होतो.
3. कोरल
कोरल हे दिसायला प्रवाळ दगडांसारखे दिसू शकतात, पण त्या जिवंत रचना असते. कोरल (प्रवाळ) हे वनस्पती किंवा खडक नसून, समुद्राच्या तळाशी वसाहती करून राहणारे Cnidaria संघातील सूक्ष्म अपृष्ठवंशी प्राणी आहेत. प्रवाळ खडक हजारो सागरी जीवांचे घर आहेत आणि ते वादळांपासून समुद्राचे संरक्षण करण्यास देखील मदत करतात. प्रवाळ तोडणे हे पर्यावरणाचे मोठे नुकसान आहे.
4. जिवंत समुद्री प्राणी
बरेच लोकं स्टारफिश, खेकडे किंवा लहान मासे हे आठवण म्हणून सोबत घेऊन जातात. पण असे करणे चुकीचे आहे. प्रत्येक सजीव प्राणी हा महासागरचक्राचा एक भाग आहे. एकही प्राणी काढून टाकल्याने संपूर्ण संतुलन बिघडू शकते.
5. समुद्रकिनाऱ्यावरील दगड किंवा लाकूड
समुद्रकिनाऱ्यावरील दगड आणि लाकडं हे लाटांच्या हालचाली नियंत्रित करतात आणि अनेक प्राण्यांना आश्रय देतात. तर या गोष्टी आपल्यापैकी अनेकजण घरातील सजावट करण्यासाठी किंवा एक आठवण म्हणून घेऊन जातात. पण अशाने समुद्रकिनाऱ्याची नैसर्गिक रचना कमकुवत होऊ शकते.
योग्य आठवणी कशा परत आणायच्या?
फोटो आणि व्हिडिओ काढा.
तुमचे अनुभव तुमच्या डायरीत लिहा.
स्थानिक कला किंवा हस्तनिर्मित वस्तू खरेदी करा.
तुमच्या हृदयात समुद्राचा आवाज आणि शांतता जपा.
समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा खरा आनंद निसर्गाचा अनुभव घेण्यामध्ये आहे, त्याला नुकसान पोहोचवण्यात नाही. जर आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर भावी पिढ्या समुद्राच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकतील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)