मोदींपेक्षा मोठे फेमिनिस्ट कोणीच..; कंगना यांनी संसदेत विरोधी पक्षाला फटकारलं
हिमाचल प्रदेशातील मंडी इथल्या भाजपच्या खासदार कंगना राणौत यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. भारताच्या मुली त्यांच्या सदैव ऋणी राहतील, असं त्या म्हणाल्या. कंगना नेमकं काय म्हणाल्या, ते जाणून घ्या..

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी गुरुवारी (16 एप्रिल) लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. मोदी हे फेमिनिझ्मचे (स्त्रीवाद) एकमेव ध्वजवाहक आहेत, असंही तिने म्हटलंय. लोकसभेत संविधान (131 वी दुरुस्ती) विधेयक 2026 वरील चर्चेदरम्यान कंगना म्हणाल्या, “आज भारताच्या मुलींचा विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठे स्त्रीवादी कोणीही नाही. मोदींनी भारताच्या महिला शक्तीवर जो विश्वास दाखवला आहे, त्यासाठी भारताच्या मुली त्यांचे सदैव ऋणी राहतील.” महिला आरक्षणाची तरतूद लोकसभेच्या मतदारसंघांच्या फेररचनेशी जोडणारं घटनादुरुस्ती विधेयक, या फेररचनेसाठी आयोग नेमणारं विधेयक आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही या तरतुदीची अंमलबजावणी करणारे विधेयक अशी तीनही विधेयके लोकसभेत गुरुवारी एकत्रितपणे मांडली गेली. या विशेष लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान कंगना बोलत होत्या.
आपल्या भाषणादरम्यान कंगना यांनी या विधेयकाला मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेशी जोडण्याचं समर्थन केलं आणि ही एक घटनात्म आवश्यकता असल्याचं म्हटलंय. गुजरातमध्ये आपल्या कार्यकाळात नरेंद्र मोदींनी सातत्याने स्त्री भ्रूणहत्येविरोधात आवाज उठवला आणि या विषयावर जनजागृती करण्यासाठी काम केलं, असं कंगना म्हणाल्या. सामाजिक बदल राजकारणात प्रतिबिंबित झाला पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी नोंदवलं.
निवडणूक आयोग आणि न्यायसंस्थांवर दबाव आणून सरकारने लोकशाही संपवण्यास सुरुवात केली. आता घटनादुरुस्ती विधेयक सादर करून लोकशाहीवर उघड हल्ला केला आहे. संसदेत घटनादुरुस्ती विधेयक संमत झाल्यास देशातील लोकशाही संपेल, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली. विधेयक घाईघाईने मंजूर केल्याबद्दल विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना कंगना म्हणाल्या, “मोदीजी भारतीय महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी वेगाने काम करत आहेत.”
महिला आरक्षणाला लोकसभेच्या मतदारसंघांच्या फेररचनेशी जोडणाऱ्या घटनादुरुस्तीला कडाडून विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. नारीशक्ती आपल्या निर्णयावर आणि त्याहीपेक्षा आपल्या हेतूंवर लक्ष ठेवून आहेत. आपल्या बाजूने कोणताही वाईट हेतू दिसल्यास त्या आपल्याला कदापि क्षमा करणार नाहीत, असं म्हणत घटनादुरुस्तीला पाठिंबा द्या, नाही तर महिलांचा रोष पत्करा, असा अप्रत्यक्ष इशारा मोदींनी विरोधकांना दिला.
