शाळेचा पहिला दिवस? या 5 गोष्टींसोबत करा तुमच्या मुलाला शाळेच्या पहिल्या दिवसासाठी रेडी!

मुलगा/ मुलगी पहिल्यांदाच शाळेत जाणार, म्हणजे मुलांसोबत पालकांसाठीही परिक्षाच म्हणायची, मग यासाठी तयार कसे व्हायचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांना कसे तयार करायचे? चला या लेखातून जाणून घेऊया...

शाळेचा पहिला दिवस? या 5 गोष्टींसोबत करा तुमच्या मुलाला शाळेच्या पहिल्या दिवसासाठी रेडी!
1st day of school
Image Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 12, 2025 | 8:23 PM

प्राथमिक शाळेतील पहिला दिवस हा प्रत्येक पालक आणि मुलासाठी खूप खास असतो. कारण ही फक्त शिक्षणाचीच नाही, तर त्यांच्या आयुष्यातील एका नव्या आणि रोमांचक अध्यायाची देखील सुरुवात असते. परंतु पहिल्या दिवशी शाळेत जाताना अनेक मुलांना भिती वाटते आणि ते रडतात. त्यामुळे या दिवसासाठी योग्य आणि समजूतदारपणे तयारी करणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुमचे मूल आत्मविश्वासाने, आनंदाने आणि कोणतीही भीती न बाळगता शाळेत जाईल, यासाठी काही सोप्या आणि परिणामकारक गोष्टी लक्षात ठेवा.

1. शाळेच्या वेळेसाठी आधीपासून तयारी करा.

शाळा सुरू होण्याच्या किमान एक आठवडा आधीपासूनच मुलाला रोज ठरलेल्या वेळेला उठवायला सुरुवात करा. यामुळे त्यांच्या झोपेची आणि उठण्याची वेळ सुरळीत होते आणि सकाळी गडबड होत नाही. नियमित झोप आणि वेळेवर उठणे त्यांच्या मूडसाठीही सकारात्मक ठरते.

2. शाळेबद्दल सकारात्मक चर्चा करा

मुलाला शाळेबद्दल काय अपेक्षित आहे हे समजावून सांगा. शाळा म्हणजे नवीन मित्र, मजेदार खेळ, गोष्टी ऐकणे आणि शिकण्याचा आनंद याची ओळख द्या. शाळा म्हणजे काहीतरी कठीण किंवा भीतीदायक आहे, असा गैरसमज होऊ देऊ नका. त्यांच्या मनातील शंका आणि भीती समजून घेऊन त्यांना धीर द्या.

3. शाळेच्या परिसराशी ओळख करुन घ्या

शक्य असल्यास पहिल्या दिवशी मुलासोबत शाळेत जा. यासाठी काही शाळा असे सत्रही आयोजित करतात. अशावेळी शिक्षकांशी ओळख होणे, वर्ग पाहणे आणि खेळाच्या जागा बघणे, या गोष्टी मुलाला आत्मविश्वास देतात. शाळेची पहिली भेट शक्य असेल तर अधिकच फायदेशीर ठरते.

4. तयारीमध्ये त्यांचा सहभाग घ्या

मुलाला त्यांची बॅग, लंचबॉक्स, पाण्याची बाटली आणि कपडे स्वतः निवडण्यासाठी सांगा. त्यांना स्वतःचे सामान स्वतः ठेवताना आणि घेऊन जाताना एक वेगळा आनंद आणि जबाबदारीची जाणीव होते. हे लहान वाटत असले तरीही त्यांच्यात स्वावलंबन आणि आत्मविश्वास निर्माण करायला मदत करते.

5. भावनिक आधार द्या.

पहिला दिवस कधी कधी थोडा भावनिक असतो. अशावेळी मुलाला समजून घ्या, त्यांना सांगा की नवीन गोष्टी थोड्या वेगळ्या वाटू शकतात पण त्या अनुभवांनीच आपण शिकतो. त्यांना विश्वास द्या की तुम्ही त्यांच्या सोबत आहात.

शाळेचा पहिला दिवस जितका मुलांसाठी, तितकाच पालकांसाठीही महत्त्वाचा असतो. योग्य तयारी, संवाद आणि प्रेमाच्या आधारावर तुम्ही तुमच्या मुलाच्या शैक्षणिक प्रवासाच्या या सुरुवातीला सुंदर आणि आत्मविश्वासपुर्ण बनवू शकता.