पिझ्झासाठी ओव्हन उत्तम की मायक्रोवेव? जाणून घ्या योग्य पर्याय
घरच्या घरी पिझ्झा, केक किंवा ब्रेडसारखे पदार्थ बनवायचे असतात, तेव्हा अनेक जण गोंधळात पडतात की कोणतं उपकरण वापरावं मायक्रोवेव की ओव्हन? चला तर मग जाणून घेऊया की, या दोन उपकरणांमध्ये काय फरक आहे आणि पिझ्झा बनवण्यासाठी कोणता पर्याय अधिक योग्य आहे.

घरच्या घरी पिझ्झा बनवण्याचा विचार आला की, लगेच मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो मायक्रोवेव वापरावा की ओव्हन? अनेकदा लोक या दोन्ही उपकरणांमध्ये गोंधळात पडतात आणि चुकीचं उपकरण खरेदी करतात. मायक्रोवेव आणि ओव्हन दोघंही घरगुती किचनमध्ये उपयुक्त आहेत, पण त्यांच्या वापराचा पद्धत, तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता यामध्ये मोठा फरक असतो. या दोघांमध्ये काय फरक आहे आणि पिझ्झा किंवा इतर बेकिंग पदार्थ बनवण्यासाठी कोणता जास्त उपयुक्त ठरतो, हे जाणून घेऊया.
टेकनॉलॉजितील फरक काय ?
मायक्रोवेवमध्ये अन्न शिजवण्यासाठी मायक्रोवेव्ह रेडिएशनचा वापर केला जातो. हे रेडिएशन अन्नातील पाण्याच्या रेणूंना हालचाल करण्यास भाग पाडतात, ज्यामुळे उष्णता निर्माण होते आणि अन्न आतून गरम होते. त्यामुळे मायक्रोवेव मुख्यतः अन्न गरम करण्यासाठीच योग्य आहे. याउलट, ओव्हनमध्ये वर आणि खालच्या बाजूला लावलेले हीटिंग एलिमेंट्समधून उष्णता निर्माण होते, जी अन्न बाहेरून आत शिजवते. त्यामुळे बेकिंग, रोस्टिंगसाठी ओव्हन अधिक योग्य मानला जातो.
गरम करायचं की शिजवायचं?
मायक्रोवेवचा उपयोग प्रामुख्याने उरलेलं अन्न, दूध, चहा, पाणी गरम करणे किंवा फ्रोजन फूड डीफ्रॉस्ट करण्यासाठी केला जातो. त्यात स्टीमिंग किंवा क्विक कुकिंगसारखे मर्यादित फिचर्स असतात. तर दुसरीकडे ओव्हन प्रामुख्याने बेकिंगसाठी, केक, ब्रेड, कुकीज, पास्ता, मांस किंवा भाज्या रोस्ट करण्यासाठी वापरला जातो. ओव्हनमध्ये ग्रिलिंगसाठीही पर्याय उपलब्ध असतो. कुकिंगची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी ओव्हन हे आदर्श उपकरण ठरतं.
कोण अधिक प्रभावी?
जर तुम्हाला काही सेकंदांत अन्न गरम करायचं असेल, तर मायक्रोवेव हा जलद आणि सोपा पर्याय आहे. ओव्हन तुलनेत हळू असतो, कारण त्याला प्री-हीटिंगची गरज भासते आणि नंतर हळूहळू अन्न शिजतं. पण याचमुळे अन्न चविष्ट आणि नीट शिजतं. खास करून पिझ्झा, ब्रेड यांसारख्या पदार्थांसाठी ओव्हन अधिक फायदेशीर आहे.
कोण स्वस्त?
मायक्रोवेव तुलनेने कमी विजेचा वापर करतो, कारण त्यात काम कमी वेळेत पूर्ण होतं. म्हणूनच लहान कुटुंब किंवा विद्यार्थी यांच्यासाठी तो अधिक सोयीचा आहे. पण ओव्हनमध्ये अन्न शिजवण्यासाठी अधिक वेळ लागतो आणि त्यामुळे त्याचा वीज वापर अधिक असतो. तथापि, चवदार आणि योग्य प्रकारे शिजलेले अन्न हवं असेल, तर ओव्हनचा पर्याय श्रेष्ठ आहे.
कोणता योग्य?
जर तुम्हाला केवळ गरम करायचं असेल, तर मायक्रोवेव योग्य पर्याय आहे. पण जर तुम्हाला बेकिंग किंवा रोस्टिंगमध्ये रस असेल, खासकरून पिझ्झा, केक, कुकीज यांसाठी, तर ओव्हन हा बिनधास्त निवड करा. या दोघांमध्ये तुमच्या गरजेनुसार निवड करा आणि तुमच्या किचनमध्ये योग्य अप्लायन्स जोडा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
