एक तास स्वयंपाक करायला किती गॅस लागतो? जाणून घ्या कसं असतं सिलेंडरचं गणित

गॅस सिलेंडरच्या किंमतीत दिवसागणिक वाढ होत आहे. अशात अनेकांना माहिती नसते की, एक तास स्वयंपाक करायला किती गॅस लागतो? तर जाणून घ्या कसं असं ते गणित?

एक तास स्वयंपाक करायला किती गॅस लागतो? जाणून घ्या कसं असतं सिलेंडरचं गणित
LPG Cylinder
| Updated on: Apr 28, 2026 | 5:29 PM

वाढत्या किमती आणि इंधन तुटवड्याच्या भीतीमुळे, गॅस सिलिंडरचा काटकसरीने वापर करणे सर्वसामान्यांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. साधारणपणे 14.2 किलो वजनाचा एक घरगुती एलपीजी सिलिंडर प्रत्यक्षात किती तास वापरु शकतो? एका तासाच्या स्वयंपाकात किती गॅस वापरला जातो? इंधनाची बचत कशी करावी? याबद्दल फार कोणाला माहिती नसेल. तर जाणून घ्या, गॅसचा वापर कसा करायचा. एक किलोग्राम एलपीजी गॅसमध्ये अंदाजे 46.1 मेगाजूल ऊर्जा असते. सरासरी, गॅस स्टोव्हवरील एक बर्नर प्रति तास 7 मेगाजूल ऊर्जा वापरतो. याचा अर्थ असा की, जर तुम्ही एकाच वेळी दोन बर्नर पेटवले, तर प्रति तास अंदाजे 14 मेगाजूल ऊर्जा वापरली जाते. वजनाच्या बाबतीत, दोन्ही बर्नर मिळून प्रति तास अंदाजे 0.30 किलो गॅस वापरतात.

एक सिलेंडर किती दिवस पुरेल?: या गणनेनुसार, 14.2 किलोचा सिलेंडर न थांबता सतत वापरल्यास सुमारे 46 तास चालेल. पण, आपण आपल्या घरी दिवसातून फक्त काही तास स्वयंपाक करत असल्यामुळे, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि त्यांच्या स्वयंपाकाच्या सवयींवर अवलंबून आहे की, एक सिलेंडर काही आठवड्यांपासून ते महिन्यांपर्यंत आपण वापरु शकतो.

गॅस वाचवण्यासाठी स्वयंपाकाच्या पद्धती महत्त्वाची भूमिका बजावतात. स्वयंपाक करताना भांड्यांवर झाकण ठेवणे आवश्यक आहे. यामुळे उष्णता वाया जाण्यापासून वाचते आणि अन्न लवकर शिजण्यास मदत होते. तसेच, स्वयंपाक करण्यापूर्वी कडधान्ये किंवा धान्य एक तास भिजवून ठेवल्याने स्वयंपाकाचा वेळ कमी होतो आणि भरपूर गॅसची बचत होते.

स्टोव्हवरील मोठ्या बर्नरपेक्षा लहान बर्नर कमी गॅस वापरतात. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकासाठी लहान बर्नर वापरणे चांगले. तसेच, बर्नर वारंवार स्वच्छ केले पाहिजेत. जर बर्नरची छिद्रे बंद झाली, तर ज्योत व्यवस्थित बाहेर येणार नाही, ज्यामुळे केवळ गॅस वाया जात नाही तर स्वयंपाकाला उशीरही होतो.

अनावश्यकपणे जास्त इंधन न जाळून आणि गरजेनुसार ज्योत नियंत्रित करून, तुम्ही इंधनावरील खर्च कमी करू शकता. गॅस वापराविषयी जागरूकता वाढवून आणि या छोट्या खबरदारीचे पालन करून, तुमचा घरगुती सिलेंडर केवळ काही दिवस जास्त टिकेल असे नाही, तर तुमच्या खिशावरील भारही कमी होईल.

Follow Us