थंडीच्या दिवसांमध्ये घरी ‘या’ पद्धतीने बनवा हेल्दी पीनट बटर

हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही घरी पीनट बटर बनवू शकता, जे बाजारात विकल्या जाणाऱ्या पॅकेज्ड पीनट बटरपेक्षा खूपच आरोग्यदायी आहे, कारण त्यात अतिरिक्त तेल वापरले जात नाही. चला संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात..

थंडीच्या दिवसांमध्ये घरी या पद्धतीने बनवा हेल्दी पीनट बटर
| Edited By: | Updated on: Dec 02, 2025 | 9:06 PM

हिवाळा सुरू झाला की आपण या दिवसांमध्ये मिळणारे हंगामी भाज्या तसेच फळांचा आपल्या आहारात समावेश करत असतो. कारण थंडीच्या दिवसात मिळणाऱ्या भाज्यांचे व फळांचे सेवन केल्याने आपले शरीर आतून निरोगी व तंदुरस्त राहते. त्यातच आपण या दिवसांमध्ये हंगामी पदार्थांबद्दल बोलायचे झाले तर, शेंगदाणे हे एक उत्तम आहे, ज्याचे सेवन केल्यास तुमच्या आरोग्यासाठी देखील अविश्वसनीयपणे फायदेशीर ठरते. कारण शेंगदाणे हे वनस्पती-आधारित प्रथिनांचे समृद्ध स्रोत आहेत. म्हणूनच फिटनेस उत्साही लोकं त्यांच्या आहारात शेंगदाण्यापासून बनवलेल्या पीनट बटरचा समावेश करतात. मात्र बाजारात मिळणारे पीनट बटरमध्ये अनेकदा तेलासह विविध प्रिझर्वेटिव्ह घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. तुम्ही या सोप्या स्टेपमध्ये तेलाशिवाय घरी उत्कृष्ट पीनट बटर बनवू शकता. कसे ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते , 100 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये 25.8 ग्रॅम प्रथिने असतात. त्यामध्ये 8.5 ग्रॅम आहारातील फायबर, 92 मिलीग्राम कॅल्शियम, 4.58 मिलीग्राम लोह, 168 मिलीग्राम मॅग्नेशियम, 376 मिलीग्राम फॉस्फरस, 705 मिलीग्राम पोटॅशियम, 3.27 मिलीग्राम जस्त,1.14 मिलीग्राम तांबे आणि 1.93 मिलीग्राम मॅंगनीज असते. शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅटी ॲसिड्स तसेच काही बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे देखील असतात.

पीनट बटर बनवण्यासाठी लागणारे साहित्य

तुम्हाला 300 ग्रॅम शेंगदाणे (अंदाजे 2 कप)

एक चतुर्थांश चमचा काळे मीठ

1चमचा मेपल सिरप किंवा मध (चवीनुसार तुम्ही मधाचे प्रमाण थोडे वाढवू शकता.)

1 चमचा तूप (पर्यायी) लागेल.

जर तुम्ही 500 ग्रॅम किंवा त्याहून अधिक शेंगदाणे वापरत असाल तर तुम्ही थोडे जास्त गोडवा आणि मीठ वापरावे.

पीनट बटर रेसिपी

पहिली स्टेप म्हणजे सर्व शेंगदाणे एका जाड पॅनमध्ये टाकून मंद आचेवर भाजून घ्या. सतत यामध्ये चमचा फिरवत राहा, नाहीतर शेंगदाणे जळतील.

शेंगदाणे भाजण्यासाठी तुम्हाला सुमारे 20 मिनिटे लागतील, कारण ते खूप कमी आचेवर भाजावे लागतात जेणेकरून सर्व कच्चेपणा निघून जाईल.

एकदा भाजल्यानंतर शेंगदाण्यांना चांगला वास येऊ लागतो आणि त्यांच्या सालीचा रंग थोडा बदलतो. या टप्प्यावर त्यांना एका प्लेटमध्ये काढा आणि थोडा वेळ थंड होऊ द्या.

शेंगदाणे थंड झाल्यावर त्यांना स्वच्छ टॉवेलमध्ये ठेवा आणि ते पूर्णपणे घासून घ्या. यामुळे सर्व साली काही वेळातच निघून जातील, अन्यथा खूप वेळ लागू शकतो.

जर तुम्हाला पीनट बटरमध्ये शेंदाण्याचे क्रंच हवे असेल, तर शेंगदाण्यांची सालं काढून टाकल्यानंतर थोडे शेंगदाणे घ्या आणि ते मिक्सर जार मध्ये टाकून हलका दाणेदार कुट करून घ्या.

आता उरलेले शेंगदाणे मिक्सर ग्राइंडरमध्ये टाका आणि ते अगदी बारीक पावडर स्वरूपात चांगले बारीक करा. जर बारीक करताना जास्त कोरडे वाटत असेल तर एक चमचा तूप टाका.

जेव्हा स्मुथ पेस्ट तयार होते तेव्हा त्यात मध किंवा गूळ टाका आणि एक किंवा दोनदा मिक्समध्ये फिरवून घ्या. जेणेकरून ते चांगले मिक्स होईल.

अशाप्रकारे तुमचे पीनट बटर तयार होईल, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह नसतात आणि ते तुमच्या आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी असते.

तुम्ही पीनट बटर हवाबंद काचेच्या भांड्यात ठेवू शकता, जे रेफ्रिजरेटरमध्ये न ठेवताही बरेच दिवस चांगले ठेवता येते आणि ते अजिबात खराब होत नाही.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)