गाजरापासून बनवा ‘हे’ दोन चविष्ट पदार्थ, खाल्ल्यानंतर घरातील सगळेच म्हणतील व्वा…

आपण पाहतोच की गाजरापासून बऱ्याचदा हलवा बनवला जातो जो की प्रत्येकाला खायला आवडतो. पण याव्यतिरिक्त तुम्ही गाजरापासून हे दोन चविष्ट पदार्थ नक्की बनवून पाहा, घरातील मुलांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आवडेल. जाणून घ्या दोन पदार्थांची रेसिपी.

गाजरापासून बनवा हे दोन चविष्ट पदार्थ, खाल्ल्यानंतर घरातील सगळेच म्हणतील व्वा...
Gajar Barfi
| Edited By: | Updated on: Nov 05, 2025 | 11:11 PM

हिवाळा सुरू झाला की बाजारपेठेत गाजरं मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. गाजर बहुतेक लोकांचे आवडते असल्याने त्यापासून विविध पदार्थ बनवुन आहारात समावेश केला जातो. कारण गाजरं केवळ स्वादिष्टच नाहीत तर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लोकं सामान्यत: गाजराचा रस पितात किंवा गाजराचा हलवा बनवून खातात आणि प्रत्येक खास प्रसंगी, लग्नात किंवा इतर कार्यक्रमांमध्ये गाजराचा हलवा हा स्वीट डिशचा एक भाग असतो. परंतु यापलीकडे तुम्ही गाजरापासून अनेक पदार्थ बनवून त्यांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता.

गाजरांमध्ये भरपूर पाणी असते. त्यात फायबर, व्हिटॅमिन ए, बायोटिन, व्हिटॅमिन के१, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी६, बीटा-कॅरोटीन आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. म्हणूनच, ते आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहेत. तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की गाजराचा हलवा आणि भाज्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांच्यापासून कोणते चविष्ट पदार्थ बनवू शकता.

गाजर बर्फी

साहित्य: गाजर बर्फी बनवण्यासाठी तुम्हाला 500 ग्रॅम गाजर, 3 टेबलस्पून तूप, 3/4 कप साखर, 1/2 कप सुके खोबऱ्याचा किस, 1/4 कप दुधाची पावडर, 1/2 वेलची पूड, 500 मिली दूध, बारीक कापलेले काजू, बदाम आणि अक्रोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा टाकू शकता.

गाजर बर्फी बनवण्याची पद्धत

  • गाजर बर्फी बनवण्यासाठी प्रथम गाजर धुवून पुसून घ्या.
  • त्यानंतर गाजर बारीक किसून घ्या.
  • एका पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात किसलेला गाजर टाका आणि 2 ते 3 मिनिटे परतवा.
  • गाजर परतुन झाल्यावर त्यात साखर मिक्स करा. त्यानंतर त्यात बारीक ड्रायफ्रूट पावडर, नारळ पावडर, दुध पावडर आणि वेलची पावडर टाकून आणि मिक्स करा. गाजरामध्ये टाकलेली साखर पूर्णपणे विरघळली की त्यात दूध टाका.
  • दुधाला उकळी आल्यावर त्यात ड्रायफ्रूट पेस्ट टाका आणि चांगले मिक्स करा. काही वेळाने जेव्हा गाजर पूर्णपणे दूधात शिजल्यावर पॅनमधून जेव्हा हे मिश्रण वेगळं होऊ लागेल तेव्हा ते एका प्लेटमध्ये काढा. थोडा वेळ हे मिश्रण थंड होऊ द्या. नंतर ते बर्फीच्या आकारात कापून घ्या. तुम्ही त्यावर चांदीच्या वर्कने सजवू शकता. त्याची चव अद्भुत आहे, ज्यामुळे ते मुलांनाही आणि मोठ्यांनाही खायला खूप आवडेल.

गाजर कोशिंबीर

साहित्य – गाजर कोशिंबीर ही डिश बनवण्यासाठी तुम्हाला गाजर, साखर, मीठ, लिंबू, भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट, हिंग, तेल, मोहरी, कांदे, धणे आणि हिरव्या मिरच्या लागतील. जर तुम्हाला बीट आवडत असेल तर तुम्ही ते देखील यात टाकू शकता.

कृती – प्रथम 250 ग्रॅम गाजर किसून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चवीनुसार साखर, मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करा. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा. फोडणी तयार करण्यासाठी एका लहान पॅनमध्ये तेल, हिंग आणि मोहरी एकत्र करा. मोहरी तडतडायला लागल्यावर त्यात कढीपत्ता टाका. वरील गाजराच्या मिश्रण मध्ये ही फोडणी टाका आणि मिश्रण एकजीव करा. स्वादिष्ट आणि निरोगी गाजर कोशिंबीर तयार आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)