धर्मेंद्र यांच्या अंत्यविधीबद्दल अखेर सलमानने सोडलं मौन; सनी-बॉबी देओलबद्दल म्हणाला..
दिवंगत अभिनेते धर्मेंद्र हे अभिनेता सलमान खानसाठी वडिलांसमान होते. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेदरम्यान धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा देताना सलमानचे डोळे पाणावले होते. यावेळी त्याने धर्मेंद्र यांच्या अंत्यविधीबद्दलही मौन सोडलं.

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले इथल्या पवनहंस स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही मोजके सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यानंतर सनी – बॉबी देओल यांच्याकडून एक आणि हेमा मालिनी यांच्याकडून दुसऱ्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराबद्दल असंख्य चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. धर्मेंद्र यांची अंत्ययात्रा काढायला हवी होती, चाहत्यांना त्यांना अखेरचं पाहण्याची संधी मिळायला पाहिजे होती, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. त्यावरून काहींनी देओल कुटुंबीयांवर टीकाही केली होती. यावर आता अभिनेता सलमान खानने मौन सोडलं आहे. ‘बिग बॉस 19‘च्या ग्रँड फिनालेदरम्यान धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी धर्मेंद्र यांना आठवत सलमानच्या डोळ्यात अश्रू आले. याच वेळी त्याने धर्मेंद्र यांच्या अंत्यविधीबद्दल वक्तव्य केलं.
“धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं आणि 24 नोव्हेंबरला माझ्या वडिलांचा वाढदिवस असतो. माझी आई आणि धर्मेंद्र यांच्या वाढदिवसाची तारीख एकच आहे. तुम्हाला मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की, जर मला इतकं वाईट वाटत असेल, दु:ख होत असेल तर धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांना, सनी-बॉबी, ईशा-अहाना, हेमाजी, प्रकाश आंटी यांना कसं वाटत असेल,” अशा शब्दांत सलमानने भावना व्यक्त केल्या.
तो पुढे म्हणाला, “दोन जणांचा अंत्यविधी आणि शोकसभा अत्यंत व्यवस्थितप्रकारे पार पाडण्यात आलं होतं. एक दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या आईच्या निधनानंतर आणि दुसरं धर्मेंद्र यांच्या निधनानंतर. कुटुंबीयांनी अत्यंत आदरपूर्वक सर्व नियोजन केलं होतं. अर्थात सर्वजण रडत होते, परंतु एक जो आदर आणि जी सभ्यता असायला हवी, आयुष्याचं सेलिब्रेशन जसं असायला हवं.. ते इथे होतं. यासाठी मी सनी, बॉबी आणि सर्व कुटुंबीयांना सलाम करतो. प्रत्येक अंत्यसंस्कार आणि शोकसभा अशाच पद्धतीने पार पडायला हवेत.”
धर्मेंद्र यांनी जुहू इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या निधनाच्या वृत्ताबद्दल बराच संभ्रम होता, कारण देओल कुटुंबीयांकडून कोणतीच अधिकृत माहिती दिली जात नव्हती. जेव्हा अचानक हेमा मालिनी, ईशा देओल यांच्यापाठापोठ अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान असे सेलिब्रिटी विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर पोहोचले, तेव्हा त्यांच्या निधनाच्या वृत्तांनी अधिक जोर धरला होता. जुहू इथल्या बंगल्याबाहेर आणि स्मशानभूमीवरही कडक सुरक्षाव्यवस्था असल्याने चाहत्यांना धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देता आला नाही. अनेकांनी स्मशानभूमीसमोर रस्त्याच्या कडेला उभं राहून जड अंत:करणाने, पाणावलेल्या डोळ्यांनी धर्मेंद्र यांना निरोप दिला. यावरून आता काहींनी देओल कुटुंबाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
