
असं म्हटलं जातं की, लहान मुलांच मन (small kids) हे एखाद्या कोऱ्या टिपकागदासारखं असतं. त्यांना जे दिसतं, ते त्या गोष्टी टिपून घेतात आणि तसचं वागायला शिकतात. त्यामुळे पालकांनी लहानपणापासूनच मुलांना चांगल्या गोष्टी शिकवाव्यात, चांगल्या सवयी लावाव्यात. पण मुलं सगळ्या चांगल्या गोष्टी शिकतीलच असं नाही. घरातून बाहेर पडल्यावर शाळेत किंवा दुसऱ्या मुलांसोबत खेळताना त्यांचं बघून आपली मुलंही नटखट होतात किंवा खोड्या काढायला शिकतात. हे अतिशय नॉर्मल आहे. मात्र काही वेळा मुलांना वाईट सवयीही (bad habits) लागतात. काही-काही मुलं ओरडायला किंवा शिव्या द्यायला शिकतात. लहानपणापासूनच शिव्यांची (kids saying bad words) सवय लागली, तर मोठेपणीही तीच सवय कायम राहते आणि भविष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुमचं मुलही वाईट संगतीत असेल, शिव्या देत असेल तर त्याला वेळीच रोखावे. त्याची ही सवय लवकर सोडवावी. मोठेपणी अशा सवयी सुटणे कठीण असते. मुलांच्या वाईट सवयी, शिव्या देण्याच्या सवयी बंद व्हाव्यात यासाठी काही उपाय करून पहा.
तसं पहायला गेलं तर मुलं घरात, मोठ्यांसमोर शिव्या देत नाहीत, तर ते समोर नसतानाच अपशब्द वापरतात. मात्र ही सवय फार काळ लपून राहू शकत नाही. जर तुमच्यासमोर तुमच्या मुलाने अथवा मुलीने एखादी शिवी दिली, तर त्यांना तिथल्या तिथे थांबवून या गोष्टीबाबत प्रेमाने समजवावे. त्यांना सांगावे की, ते एक चांगली व्यक्ती आहेत आणि त्यांच्या तोंडून शिव्या ऐकणे बिलकुल चांगले वाटत नाही.
तुमच्या मुलांचे मित्र कोण, ते कोणाच्या संगतीत राहतात, याकडे नीट लक्ष द्या. मुलं जरी तुमच्यासमोर शिव्या देत नसतील तरी नंतर ते अपशब्दांचा वापर करताना दिसल्यास वेळच्या वेळी त्यांना थांबवा. वाईट संगतीतील मुलांसोबत ते वेळ घालवत असतील, तर त्यांना व त्यांच्या मित्रांना समजवा. त्यांच्यावर नजर ठेवा. वाईट शब्द उच्चारणाऱ्या मुलांपासून तुमच्या मुलांना दूर ठेवा.
मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे, अभ्यासात त्यांची प्रगती कशी होत आहे, हेही नीट लक्ष देऊन बघा. जर त्यांना चांगले गुळ मिळत नसतील आणि त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल, तर त्यांना वेळच्यावेळी, प्रेमाने या गोष्टीची समज द्या. मुलं वाईट संगतीत असतील तर त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. मुलांना अभ्यासाची गोडी लावा आणि त्यांच्या शिक्षकांच्या नियमित संपर्कात रहा.
मुलांना लहानपणापासूनच प्रेरणात्मक गोष्टी ऐकवण्यास सुरूवात करा. रामायण, महाभारत, वीर पुरुषांच्या-महिलांच्या गोष्टी त्यांना ऐकवून त्यातील सार सांगत जा. त्यातून मुलांमध्ये नैतिक शिक्षणाचा विकास होईल व त्यांच्यावर कोणाच्याही वाईट संगतीचा परिणाम होणार नाही. ज्या मुलांना त्यांचे आई-वडील लहानपणापासूनच चांगल्या सवयी शिकवतात, ती मुलं कधी वाईट संगतीला लागत नाहीत.
मुलांना योग्य गोष्ट कोणती आणि अयोग्य काय, यातील फरक समजावणे खूप आवश्यक आहे. चूक किंवा बरोबर काय हे जोपर्यंत त्यांना समजत नाही, तोपर्यंत त्यांची वागणूक कोणत्या दिशेने होत आहे, हे त्यांना समजू शकणार नाही. त्यांना चांगली व्यक्ती कोण व वाईट कोण, हे ओळखायला शिकवा. त्यामुळे भविष्यात ते वाईट संगतीपासून दूर राहतील आणि त्यांच्या जाळ्यात अडकणार नाहीत.