मुलगा, मुलगी अन् पुतण्या…; संभाजीनगरमध्ये बड्या नेत्यांची मुलं मैदानात, किती जणांनी भरला अर्ज?
छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीत संजय शिरसाट, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या नातेवाईकांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, भाजपने ९६ उमेदवारांना बी फॉर्म देत मोठी आघाडी घेतली आहे.

राज्यात सर्वत्र महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुक रणधुमाळीने आता निर्णायक वळण घेतले आहे. महायुती तुटल्यानंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. भाजपने सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरवत शहरात आपली ताकद पणाला लावली आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांच्या मुला-मुलींनी आणि नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे आता ही निवडणूक घराणेशाही विरुद्ध नवे चेहरे असा वादात रंगण्याची शक्यता आहे.
कोणाल्या मुलाला तिकीट
येत्या महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा त्यांच्या वारसांच्या निकालावर अवलंबून असणार आहे. आमदार संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट ही प्रभाग १८ आणि मुलगा सिद्धांत शिरसाट हा प्रभाग २९ मधून निवडणूक लढवत आहेत. तर विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे प्रभाग १६ मधून रिंगणात आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे प्रभाग १५ मधून आपले नशीब आजमावत आहेत. शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जैस्वाल प्रभाग १५ मधून निवडणूक लढवत आहे.
९६ उमेदवारांना अधिकृत बी फॉर्म
महायुती तुटल्याच्या अवघ्या तीन तासांत भाजपने ९६ उमेदवारांना अधिकृत बी फॉर्म देऊन सर्वांना धक्का दिला. भाजपच्या या रणनीतीमुळे ते शहरातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी म्हणून समोर आले आहेत. यात भाजपने ५० माजी नगरसेवकांना पुन्हा संधी दिली आहे. तर इतर पक्षांतून आलेल्या १३ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तसेच ४६ नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देऊन भाजपने संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाने तरुणांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले असले तरी, प्रत्यक्षात ३० उमेदवार ५० ते ७० वयोगटातील आहेत. तर २५ ते ३५ वयोगटातील २६ तरुणांना संधी देण्यात आली आहे.
उमेदवारांची धाकधूक वाढली
छत्रपती संभाजीनगरातील महापालिका निवडणुकीसाठी शहरात एकूण २९ प्रभागांतील ११५ जागांसाठी तब्बल १,८७० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत दिवसभर अर्जांची लगबग पाहायला मिळाली. आज या अर्जांची छाननी होणार असून, तांत्रिक त्रुटीमुळे आपला अर्ज बाद तर होणार नाही ना, या चिंतेने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
