तुमचा पार्टनर छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडतो? नात्यात प्रेम टिकवण्यासाठी करा या गोष्टी
Relationship Tips: नात्यात प्रेम आणि विश्वास टिकवण्यासाठी एकमेकांच्या भावना समजून घेणं महत्त्वाचं असतं. मात्र, पार्टनरला वारंवार राग येत असेल, तर छोट्या गोष्टींवरूनही वाद होऊ शकतात. अशा वेळी परिस्थिती कशी हाताळावी आणि नात्यातील तणाव कसा कमी करावा, जाणून घेऊया.

नात्यात प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा जितका महत्त्वाचा असतो, तितकाच एकमेकांच्या रागाला योग्य पद्धतीने हाताळणेही गरजेचे असते. प्रत्येक कपलमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टींवरून मतभेद होत असतात. मात्र, एखादी व्यक्ती सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावत असेल, तर त्याचा परिणाम नात्यावर होऊ शकतो. अशा जोडीदारासोबत राहताना अनेकदा काय बोलावे, कसे वागावे आणि वाद कसा टाळावा, हे समजत नाही. प्रत्येक वेळी रागाला रागाने उत्तर दिल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे अशा वेळी संयम राखणे, योग्य वेळी संवाद साधणे आणि जोडीदाराच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. तुमचा पार्टनरही वारंवार रागावत असेल, तर या काही गोष्टी लक्षात ठेवा.
पार्टनर रागावल्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका
जोडीदार रागात असताना त्याच्याशी वाद घालणे किंवा प्रत्येक गोष्टीला लगेच प्रत्युत्तर देणे टाळा. कारण अशा वेळी दोघांचाही राग वाढल्यास छोट्या गोष्टीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे काही वेळ शांत राहा आणि परिस्थिती निवळल्यानंतर त्या विषयावर चर्चा करा.
पार्टनरला प्रेमाने उत्तर द्या
पार्टनर रागात असताना तुम्हीही चिडण्याऐवजी शांतपणे त्याचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला नेमका कशाचा त्रास होत आहे, हे समजून घेतल्यास गैरसमज दूर करण्यास मदत होऊ शकते. प्रेमाने आणि संयमाने संवाद साधल्याने वाद वाढण्यापासून रोखता येऊ शकते.
योग्य वेळी पार्टनरला समजावून सांगा
जोडीदार रागात असताना त्याला समजावण्याचा प्रयत्न केल्यास तो तुमचे म्हणणे ऐकण्याच्या मनःस्थितीत नसेल. त्यामुळे त्याचा मूड शांत झाल्यानंतर योग्य वेळी त्याच्याशी बोला. त्याच्या वागण्यामुळे तुम्हाला कसे वाटते, हे शांतपणे समजावून सांगा. यामुळे दोघांनाही एकमेकांच्या भावना समजून घेता येतील आणि वारंवार होणारे वाद कमी होण्यास मदत होईल.
अँगर मॅनेजमेंट थेरपीची मदत घ्या
काही व्यक्तींना रागावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. अशा वेळी जोडीदाराच्या रागामुळे नात्यात सतत तणाव निर्माण होत असेल, तर समुपदेशक किंवा मानसशास्त्रज्ञाची मदत घेण्याचा विचार करा. अँगर मॅनेजमेंट थेरपीमुळे रागाची कारणे समजून घेण्यास आणि तो योग्य पद्धतीने हाताळण्याचे मार्ग शिकण्यास मदत होऊ शकते. मात्र, यासाठी जोडीदाराची तयारी आणि दोघांमधील संवाद महत्त्वाचा आहे.
