How to keep Roti Soft : काहीही केलं तरी पोळ्या होतात वातड ? या उपायांनी नक्की राहतील मऊसूत
पोळ्या मऊसूत राहरण्यासाठी काही सोप्या टिप्सचे पालन करू शकता. त्यामुळे सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्या फ्रेश आणि मऊ राहतील. नक्की वाचा या टिप्स..

पोळी हा आपल्या भारतीय जेवणातला अविभाज्य भाग आहे. सकाल संध्याकाळ पोळी भाजी अगदी नाश्त्यालाही चहा-पोळी खाणारे कितीतरी लोकं असतात. मात्र बऱ्याच वेळेस असं होतं की केल्या केल्या मऊ राहिलेल्या पोल्या, वेळ जाईल तशा वातड होत जातात. दुपारी डबा खाणाऱ्यांना तर त्या पोळ्या कधीकधी खाववतही नाहीत. तुमच्यासोबतंही असं झालं आहे का ? कितीही प्रयत्न केले, डोकं आपटलं तरी पोळ्या मऊ राहतचं नाहीत ? मग हे नक्की वाचा.
खाली दिलेल्या काही टिप्स आणि ट्रिक्सचा अवलंब केलात तर तुमच्या पोळ्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत अगदी मऊसूत राहतील. हे नक्की ट्राय करून पहा…
मऊसूत पोळ्यांसाठी टिप्स आणि ट्रिक्स
1) कणकेपासून सुरूवात
पोळ्या मऊसूत हव्या असतील तर त्याची सुरूवात कणकेपासूनच करावी लागते, ती नीट मळली असेल तर निम्मं काम सोप्पं होतं.
कणीक मळताना आपण पाणी वापरतो, त्याऐवजी थोडं दूध घालून पहा. दुधातील प्रोटीन्समुळे कणकेतील मॉयश्चर, ओलावा टिकून राहतो आणि पोळ्याही मऊ राहण्यास मदत होते.
थोडं तेल किंवा तूप घाला. कणीक मळण्याआधी पिठात थोडं तेल किंवा तूप घाला. यामुळे ग्लूटेन सुकण्यापासून वाचते आणि पोळ्या मऊ होतात.
चांगले मळून घ्या: हे घातल्यानंतर, पीठ छान एकजीव , गुळगुळीत होईपर्यंत मळून घ्या , ते किमान 10-15 मिनिटे मळणं गरजेचं आहे.
कणीक थोडा वेळ राहू द्या : कणीक मळल्यावर लगेच पोळ्या करू नका. ते पीठ ओल्या कापडाने झाकून ठेवा आणि 20-30 मिनिटे राहू द्या. यामुळे ग्लूटेन नीट राहतं होते आणि द्रव शोषला जातो, ज्यामुळे पोळ्या आणखी मऊ होतात.
2) भाजताना घ्या काळजी
तुम्ही पोळ्या कशा भाजता यावर त्या किती मऊ राहतात हे देखील ठरवते.
तवा चांगला तापवा – तवा चांगला गरम असावा. गरम पृष्ठभाग आत वाफ निर्माण करतो, ज्यामुळे थर मऊ राहतात.
नीट भाजा – पोळ्या नीट भाजून पटकन काढल्या तर त्या सॉफ्ट होतात,तव्यावर खूव वेळ ठेवल्या तर त्या कडक होतात. त्यामुळे पोळी फुगल्यावर उलटा आणि दोन्ही बाजूंना सोनेरी डॉट्स येईपर्यंत थांबा. मग त्या तव्यावरून काढून घ्या.
3) नीट स्टोअर करा
पोळी कितीही चांगली केली असेल पण ती नीट स्टोअर केली नाही तर ती कोरडी पडते आणि वातड होते.
स्वच्छ कापडात गुंडाळा: पोळ्या भाजून झाल्यानतंर त्या लगेच डब्यात बरू नका. त्या थोड्या थंड होऊ द्या. नंतर अतिरिक्त वाफ शोषली जाण्यासाठी पातळ कापडात किंवा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा.
हवाबंद डबा वापरा – गुंडाळलेल्या पोळ्या नीट आत ठेवा. यामुळे योग्य प्रमाणात ओलावा टिकून राहतो आणि त्या तासन्तास मऊ राहतात.
ऑफीसला किंवा बाहेर डबा नेताना – पोळ्या एखाद्या फॉईलमध्ये गुंडाळून ठेवा. त्यामुळे त्या बराच काळ फ्रेश आणि सॉफ्ट राहतील.
