
आजकाल भारतात नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलला आहे. टिंडर, बम्बल, हिंज यांसारख्या डेटिंग ॲप्सची (Dating Apps) लोकप्रियता वेगाने वाढत आहे. हलकासा संवाद साधण्यापासून ते गंभीर नातेसंबंध शोधण्यापर्यंत, किंवा ठरवून केलेल्या विवाहपलीकडे प्रेम शोधण्यापर्यंत भारतात आता ऑनलाइन डेटिंग संस्कृती अधिक मोकळेपणाने उदयास येत आहे. पण या नव्या डिजिटल रोमान्ससोबतच एक नवीन चिंताही समोर आली आहे: ती म्हणजे ऑनलाइन फसवणुकीचा (Online Scams) धोका. त्यामुळे, जर तुम्हीही डेटिंग ॲप वापरत असाल, तर ‘या’ 5 महत्त्वाच्या आणि हुशारीच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्ही कोणत्याही फसवणुकीच्या जाळ्यात अडकणार नाही.
ऑनलाइन कोणा अनोळखी व्यक्तीशी बोलताना तुमचे घराचे पत्ते, मोबाईल नंबर, बँक डिटेल्स किंवा ऑफिसची माहिती अजिबात शेअर करू नका. ही माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडल्यास तो तिचा गैरवापर करू शकतो, जसे की तुमची ओळख चोरणे (Identity Theft) किंवा तुमचा पाठलाग करणे.
जर कोणी खूप लवकर प्रेमाची कबुली देत असेल, व्हिडिओ कॉल टाळत असेल किंवा भावनिक कारणे सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, तर लगेच सतर्क व्हा. अनेक बनावट प्रोफाईल्स (Fake Profiles) अशाच भावनिक खेळांतून विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतात.
‘मॅच’ झालेल्या व्यक्तीच्या फोटोचे ‘रिव्हर्स इमेज सर्च’ (Reverse Image Search) करा आणि त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईल्स तपासा. जर समोरची व्यक्ती त्यांचे सोशल मीडिया शेअर करण्यास कचरत असेल किंवा दिलेली माहिती जुळत नसेल, तर हा एक मोठा धोक्याचा इशारा (Alarm) समजा.
फसवणूक करणारे अनेकदा एखाद्या खोट्या आपत्कालीन स्थितीचे कारण सांगून पैशांची मागणी करतात. त्यांची कथा कितीही खरी वाटली तरी, ज्या व्यक्तीला तुम्ही कधी पाहिले नाही, त्याला पैसे पाठवू नका. तुमची कष्टाची कमाई कोणत्याही फसवणूक करणाऱ्याच्या हातात देऊ नका.
टिंडर, बम्बल आणि इतर सर्व डेटिंग ॲप्समध्ये ‘रिपोर्ट’ (Report) आणि ‘ब्लॉक’ (Block) करण्याचे पर्याय असतात. जर एखादे प्रोफाईल संशयास्पद वाटले (उदा. खोटा फोटो, जास्त प्रेम दाखवणे, खरी ओळख लपवणे), तर त्याला त्वरित रिपोर्ट करा. यामुळे तुम्ही स्वतःला आणि इतरांनाही सुरक्षित ठेवू शकता.
ऑनलाइन डेटिंग तुमच्यासाठी एक उत्तम अनुभव ठरू शकते, पण ते तेव्हाच, जेव्हा तुम्ही सतर्क राहाल. या टिप्स तुम्हाला केवळ फसवणुकीपासून वाचवणार नाहीत, तर विश्वासार्ह संबंध निर्माण करण्यासही मदत करतील. प्रेम शोधा, पण हुशारीने.