जगातील सर्वात उष्ण ठिकाण कोणते? कसे असतात जनजीवन? जाणून घ्या

भारतात सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट आणि दिल्लीतील ४२ अंश तापमानही डेथ व्हॅलीच्या तुलनेत फार सौम्य वाटते. मात्र तरीही, वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

जगातील सर्वात उष्ण ठिकाण कोणते? कसे असतात जनजीवन? जाणून घ्या
hottest place on earth
| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 10:35 PM

सध्या भारतात उष्णतेची लाट चांगलीच जोर धरत आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. लोक प्रचंड उष्णतेने त्रस्त झाले असून अनेक ठिकाणी उष्माघाताची (हीट स्ट्रोक) स्थिती निर्माण होत आहे. काही राज्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावल्यामुळे तापमानात थोडी घट झाली असली तरी, उत्तर भारतातील परिस्थिती अजूनही बिकट आहे. मात्र, जगात असेही एक ठिकाण आहे जिथे उष्णतेचे प्रमाण इतके प्रचंड आहे की, दिल्लीची ही ४२ अंशांची गर्मीसुद्धा त्यासमोर फारच कमी वाटते.

डेथ व्हॅली : जर तुम्हाला वाटत असेल की पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण म्हणजे डेथ व्हॅली (Death Valley) आहे तर तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील फर्नेस क्रीक भागात वसलेली ही डेथ व्हॅली, तापमानाच्या बाबतीत सतत नवे उच्चांक गाठत असते.

१० जुलै १९१३ रोजी इथे तब्बल ५६.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. हे आजवर नोंदवले गेलेले जगातील सर्वाधिक तापमान आहे. ईतकेच नव्हे तर डेथ व्हॅलीत उन्हाळ्यात सरासरी तापमानच ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास असते.

येथील प्रखर उष्णता फक्त हवेत मर्यादित नाही, तर जमिनीवरदेखील ती आणखी जास्त असते. १५ जून १९७२ रोजी डेथ व्हॅलीतील जमिनीचे तापमान थेट ९३.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले होते. हे तापमान उकळत्या पाण्याच्या तापमानापेक्षा केवळ ६ अंशांनीच कमी आहे. इतकेच नाही तर, या जमिनीवर एखादे अंडे फोडले तरी ते काही मिनिटांत आपोआप शिजते, असे येथील लोक सांगतात.

डेथ व्हॅली ही जगातील सर्वाधिक कोरड्या आणि कमी पावसाच्या भागांपैकी एक आहे. येथे वर्षभरात केवळ सुमारे २ इंच किंवा त्यापेक्षाही कमी पाऊस पडतो. त्यामुळे येथील जमिनीवर हिरवळ फारशी दिसत नाही. उन्हाळ्यात येथे सतत रखरखीत आणि कोरडे हवामान असते.

डेथ व्हॅलीतील प्रचंड उष्णता आणि कोरडे वातावरण यामुळे हे ठिकाण केवळ पर्यटकांसाठीच नव्हे तर हवामानशास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि साहसिक लोकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. येथे जगण्यासाठी विशेष तयारी करावी लागते, कारण उष्णतेचा हा तडाखा सर्वसामान्य माणसाच्या सहनशक्तीच्या मर्यादांनाही पार करतो.

डेथ व्हॅलीतील जनजीवन

डेथ व्हॅलीमध्ये कायमच उष्णता आणि कोरडे हवामान असल्यामुळे येथे फारसे लोक राहत नाहीत. तरीसुद्धा काही लहान गावं आणि समुदाय येथे वसलेले आहेत. यामध्ये फर्नेस क्रीक आणि स्टोव्हपाइप वेल्स ही दोन प्रमुख वसाहती आहेत जिथे फार कमी लोकसंख्या असते. हे लोक मुख्यतः टुरिस्ट गाइड, हॉटेल कर्मचारी, पार्क रेंजर किंवा वैज्ञानिक संशोधनासाठी काम करणारे असतात.