माफी मागण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या

तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमची माफी समोरच्या व्यक्तीसाठी किती महत्त्वाची असते? काही वेळा फक्त 'सॉरी' बोलणे पुरेसे नसते. एका नवीन संशोधनातून माफी मागण्याची एक खास पद्धत समोर आली आहे, ती नक्की जाणून घ्या.

माफी मागण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 27, 2025 | 8:20 PM

आयुष्यात अनेकदा आपल्याकडून चुका होतात आणि आपल्याला माफी मागावी लागते. पण फक्त ‘सॉरी’ बोलून पुरेसे नसते. अनेकदा आपल्याला योग्य शब्द सापडत नाहीत, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण मनापासून माफी मागत नाहीये. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून एक खास गोष्ट समोर आली आहे, जी तुमची माफी अधिक प्रभावशाली बनवू शकते.

माफी का महत्त्वाची आहे?

संशोधनानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती माफी मागते, तेव्हा समोरच्या व्यक्तीला चांगले वाटते. एवढेच नाही तर त्यांच्या नात्यातील दुरावा कमी होऊन पुन्हा चांगले संबंध निर्माण होण्याची शक्यता वाढते. याचा अर्थ, माफी खऱ्या अर्थाने काम करते. पण, ती काम करण्यासाठी ती प्रामाणिक वाटणे आवश्यक आहे.

माफी अधिक प्रामाणिक कशी वाटेल?

माफी अधिक प्रामाणिक वाटण्यासाठी ती ‘खर्चिक’ असावी, असे रिसर्चमध्ये म्हटले आहे. याचा अर्थ, तुम्ही माफी मागण्यासाठी वेळ, मेहनत किंवा प्रयत्न खर्च करायला तयार आहात, हे दिसले पाहिजे. यासाठी पैसेच खर्च करावे असे नाही.

माफी मागताना अधिक प्रयत्न करण्याची एक सोपी पद्धत म्हणजे ‘लांब शब्दांचा’ वापर करणे. संशोधनानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती माफी मागण्यासाठी लांब आणि थोडे जड शब्द वापरते, तेव्हा समोरच्याला ती अधिक प्रामाणिक वाटते.

उदाहरणार्थ, ‘माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर’ हे वाक्य सोपे आहे. पण ‘माझ्या चुकीमुळे तुला झालेल्या त्रासासाठी मी खूप दिलगीर आहे’ हे वाक्य ऐकल्यावर अधिक प्रामाणिक वाटते. दुसऱ्या एका संशोधनात, लोकांनी लांब शब्दांचा वापर केलेल्या वाक्यांना अधिक प्रामाणिक मानले, कारण ते वाक्य बोलणाऱ्याच्या प्रयत्नांचे प्रतीक वाटते.

लक्षात ठेवा : लांब शब्द बोलणे किंवा लिहिणे थोडे कठीण असले तरी, ते तुमच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. आणि समोरच्या व्यक्तीला हे प्रयत्न दिसल्यामुळे तुमची माफी अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे, पुढच्या वेळी माफी मागताना योग्य शब्दांची निवड नक्की करा.

माफी मागताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा 

१. प्रयत्न करा: नुसते ‘सॉरी’ म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कृतीतून पश्चात्ताप दाखवू शकता.

२. समोरच्या व्यक्तीला महत्त्व द्या: माफी मागताना समोरच्या व्यक्तीच्या भावनांना महत्त्व द्या.

३. पुनरावृत्ती टाळा: जर तुम्ही वारंवार माफी मागत असाल, तर ती निरर्थक वाटू शकते.