
आजकाल पाळीव प्राणी फक्त घरातले सदस्य नसून कुटुंबाचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्यामुळे सुट्टीवर जायचं ठरल्यावर त्यांना मागे सोडून जाणं अनेकांसाठी खूप कठीण असतं. पण पाळीव प्राण्यांसोबत प्रवास करणं हे सोपं नाही. त्यासाठी योग्य नियोजन, काळजी आणि काही खास तयारी करणं आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील.
डॉक्टरांचा सल्ला घ्या: प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या पाळीव प्राण्याची आरोग्य तपासणी (Health Checkup) करून घ्या. जर त्याला काही त्रास असेल तर प्रवासात त्रास होऊ शकतो. सर्व आवश्यक लसीकरण झालेले आहे का, याची खात्री करा. डॉक्टरांकडून प्रवासात लागणारी औषधे आणि फर्स्ट एड किट घेऊन ठेवा.
कार प्रवास: जर तुम्ही कारने जात असाल, तर हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कुठेही थांबू शकता, ज्यामुळे तुमच्या पाळीव प्राण्याला आराम मिळतो. कारमध्ये त्याला सुरक्षितपणे बसवण्यासाठी योग्य पेटी किंवा सीट बेल्ट वापरा.
फ्लाइट प्रवास: फ्लाइटने प्रवास करताना आधी एअरलाईनचे नियम काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक कंपनीचे नियम वेगवेगळे असतात आणि काही ठिकाणी पाळीव प्राण्यांना घेऊन जाण्यावर निर्बंध असू शकतात. त्यामुळे पेट-फ्रेंडली फ्लाइट निवडणे महत्त्वाचे आहे.
आवश्यक वस्तूंची यादी: प्रवासात तुमच्या पाळीव प्राण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची एक यादी तयार करा. त्यात त्याचे नियमित जेवण, पिण्याचे पाणी, आवडते खेळणे, पट्टा, पिशव्या आणि आवश्यक औषधे यांचा समावेश करा. त्याला नवीन ठिकाणी शांत वाटण्यासाठी त्याच्या नेहमीच्या जागेवरची एक चादर किंवा कपडा सोबत ठेवा.
पाळीव प्राणी मित्र ठिकाणे (Pet-Friendly Locations): तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात, ते ठिकाण पाळीव प्राण्यांसाठी योग्य आहे का, याची खात्री करा. तिथे राहण्यासाठी पाळीव प्राण्यांना परवानगी देणारी हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्स शोधा. काही पर्यटन स्थळांवर पाळीव प्राण्यांना प्रवेश नसतो, त्यामुळे अशा ठिकाणांची माहिती आधीच काढून ठेवा.
वेळेनुसार नियोजन करा: प्रवासाचा संपूर्ण अनुभव तुमच्या पाळीव प्राण्यासाठी आरामदायक असावा. त्यामुळे लांबचा प्रवास करत असाल तर मध्ये मध्ये थांबा. त्याला थोडा वेळ बाहेर फिरायला घेऊन जा, पाणी पाजा आणि त्याला नैसर्गिक क्रिया करण्यासाठी संधी द्या.
टीप: कधीकधी पाळीव प्राण्याला सोबत घेऊन जाणे योग्य निर्णय नसतो. जर तुमचा पेट खूप घाबरत असेल, छोटा असेल किंवा त्याला प्रवासाचा त्रास होत असेल, तर त्याला एखाद्या चांगल्या पेट सिटरकडे ठेवणे किंवा पाळीव प्राण्याची काळजी घेणाऱ्या संस्थेत ठेवणे अधिक योग्य ठरू शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)