जेवणासोबत 2 हिरव्या मिरच्या खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो? फायदा की तोटा? तज्ज्ञांनी दिली माहिती

Green Chilli Benefits : हिरवी मिरची केवळ अन्नाला तिखट आणि चविष्ट बनवत नाही, तर त्यात अनेक असे पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. याचे खास फायदे जाणून घेऊयात.

जेवणासोबत 2 हिरव्या मिरच्या खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो? फायदा की तोटा? तज्ज्ञांनी दिली माहिती
Green Chillie
Image Credit source: Google
| Updated on: Mar 14, 2026 | 4:58 PM

भारतीय आहारात हिरव्या मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक लोक चव वाढवण्यासाठी जेवताना एक किंवा दोन हिरव्या मिरच्या नक्की खातात. हिरवी मिरची केवळ अन्नाला तिखट आणि चविष्ट बनवत नाही, तर त्यात अनेक असे पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच पचनसंस्थादेखील सुधारते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आपण दररोजच्या जेवणासोबत 2 हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो हा प्रश्न अनेकांना पडलेला असेल. काही लोकांच्या मते त्यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, तर काहींचे म्हणणे आहे की जास्त मिरची खाल्ल्याने गॅस, जळजळ किंवा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मात्र दोन हिरव्या मिरच्या खाल्ल्यास नेमकं शरीरात काय होते हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.

तज्ज्ञ काय सांगतात?

सोशल मीडियावर डायटिशियन लीमा महाजन यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी रोजच्या जेवणासोबत 2 हिरव्या मिरच्या खाण्याचे फायदे सांगितले आहेत. लीमा महाजन यांच्या मते हिरव्या मिरचीत कॅप्सायसिन नावाचा एक विशेष घटक असतो, जो शरीरासाठी फायदेशीर आहे. कॅप्सायसिनमुळे शरीरात थर्मोजेनेसिस ही प्रक्रिया वाढू शकते. त्यामुळे शरीर उष्णता निर्माण करण्यासाठी अधिक ऊर्जा वापरते आणि जास्त कॅलरी बर्न होतात. याचाच अर्थ वजन कमी होण्यास मदत होते.

हिरव्या मिरचीत आढळते व्हिटॅमिन C

लीमा महाजन यांनी सांगितले की, हिरव्या मिरचीत लिंबापेक्षाही अधिक व्हिटॅमिन C असते. त्यामुळे हिरवी मिरची इम्युनिटी वाढवणे आणि कोलेजन उत्पादन वाढवणे यासाठी उपयुक्त मानली जाते.

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत

लीमा महाजन यांनी सांगितले की, काही अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की मिरचीत असलेले कॅप्सायसिन इन्सुलिन रिस्पॉन्स सुधारण्यास मदत करते. त्यामुळे जेवणासोबत 2 हिरव्या मिरच्या खाल्ल्यास अचानक ग्लुकोज वाढत नाही, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते.

शरीर थंड ठेवण्यास मदत होते

उन्हाळ्यात हिरवी मिरची खाल्ल्यास शरीर थंड राहण्यास मदत होते. कारण मिरचीतील उष्णता हीट रिसेप्टर्स सक्रिय करते, त्यामुळे मेंदूला शरीर थंड करण्याचा सिग्नल मिळतो. त्यामुळे घाम जास्त येतो आणि नैसर्गिकरित्या शरीर थंड होण्यास मदत होते. मात्र तज्ज्ञ असेही सांगतात की, हिरवी मिरची फायदेशीर असली तरी ती खूप जास्त प्रमाणात खाऊ नये, याचा दुष्परिणामही होऊ शकतो.

 

Follow Us