काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत बैठकांवर बैठका

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत बैठकांवर बैठका

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही राज्यात आघाडी करण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंघाने दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आठ जागांवरुन मतभेद आहेत. या जागा कुणाला द्यायच्या, याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र, राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यातील बैठकीत या आठ जागांपैकी सहा जागांचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, उर्वरित दोन जागांबाबत अद्यापही तिढा कायम आहे.

आता काँग्रेसची बैठक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बैठक संपल्यानंतर, आता काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी काँग्रेसची बैठक पार पडेल. रात्री 9 वाजता ही बैठक नियोजित असून, या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

वाचा : त्या 6 जागा, जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकण्याची पूर्ण हमी!

शरद पवारांसोबतच्या बैठकीत राहुल गांधी यांच्यासोबत मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. त्यामुळे त्या बैठकीतील माहिती मल्लिकार्जुन खर्गे हे अशोक चव्हाणांना सांगून, पुढील रणनिती आखण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रावादीकडील काही जागा काँग्रेसला हव्या आहेत. त्यात अहमदनगरमधील जागेचाही समावेश आहे. नगरमधील या जागेवरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे नगरची जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेससाठी सोडली जाते का, याकडेही सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कुठल्याच पक्षाच्या नेत्याने अद्याप अधिकृतरित्या आजच्या बैठकीबाबत माध्यमांना माहिती दिली नाही. त्यामुळे राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यातील बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि कोणत्या जागांचा तिढा सुटला, हे दोन्ही पक्षातील नेते सांगतील, तेव्हाच स्पष्ट होईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI