ईशान्य मुंबई लोकसभा : किरीट सोमय्यांना यंदा शिवसेनेचंच आव्हान

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यभरातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. मुंबईतल्या सहा मतदारसंघामध्ये ईशान्य मुंबई मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहिलाय. या मतदारसंघाने कायम वेगवेगळे निकाल दिले असून यावेळी धक्कादायक निकालाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाट्या आला असून किरीट सोमय्या …

ईशान्य मुंबई लोकसभा : किरीट सोमय्यांना यंदा शिवसेनेचंच आव्हान

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यभरातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. मुंबईतल्या सहा मतदारसंघामध्ये ईशान्य मुंबई मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहिलाय. या मतदारसंघाने कायम वेगवेगळे निकाल दिले असून यावेळी धक्कादायक निकालाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाट्या आला असून किरीट सोमय्या इथून भाजपचे खासदार आहेत. तर आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांनी लढवून जिंकला होता. विशेष म्हणजे यापूर्वी या मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत तीनवेळा लोकसभेवर गेलेत. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला.

ईशान्य मुंबईमध्ये सलग दोनवेळा कोणीही निवडून आलं नसून प्रमोद महाजनांसारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ईशान्य मुंबईचा भाग मिश्र मतदारांचा असून मराठी, गुजराती, दलित, उत्तरभारतीयांसारखे सर्व मतदार यात आहेत. हे समीकरण ज्या पक्षाला जास्त चांगलं जमवता येईल त्याचा विजय निश्चित आहे. गेल्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपकडून ही निवडणूक लढवली होती पण मोदी लाटेसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. पण आता समीकरणं बदलली असून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी कायम शिवसेना नेतृत्वाला टीकेचं लक्ष केल्याने निवडणुकीच्या माध्यमातून ती खदखद बाहेर येण्याची शक्यता आहे.

मुलुंडपासून मानखुर्दपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला असून 2009 च्या निवडणुकीत सोमय्या यांचा फक्त 2 हजार 399 मतांनी पराभव झाला होता. पण 2014 च्या निवडणुकीत त्यांनी तब्बल 5 लाख 25 हजार 285 मते मिळवून संजय पाटील यांच्यावर मात केली. ईशान्य मुंबईतल्या एकूण सहा आमदारांपैकी तीन आमदार भाजपचे आहेत, तर शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे. त्यात मुलुंड पूर्व, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर पश्चिम ही मराठी वस्ती असलेले भाग आहेत. त्यावर आधी शिवसेनेची एकहाती सत्ता होती, पण मनसेच्या पक्ष स्थापनेनंतर हा भाग राज ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला. पण मनसेकडून अपेक्षाभंग झाल्याने हा मतदार पुन्हा शिवसेनेच्या पारड्यात मतदान टाकण्याची शक्यता आहे.

यंदाच्या निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघ जरी भाजपकडे असला तरी शिवसेनेने तिथे स्वबळाची तयारी केली आहे. मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले शिशिर शिंदे शिवसेनेचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनाच उमेदवारी दिली जाऊ शकते. आघाडीकडून या जागेवर राष्ट्रवादी उमेदवार देणार असली तरी या जागेवर संजय दिना पाटील उमेदवार राहतील अशी परिस्थिती आहे. या ठिकाणी नवाब मलिक किंवा तिसरा उमेदवार म्हणून सचिन अहीर यांना राष्ट्रवादी तिकीट देऊ शकते. ईशान्य मुंबईतली राष्ट्रवादीतली धुसफूस लपून राहिलेली नसून थेट पोलिसांपर्यंत याच्या तक्रारी गेल्या होत्या.

ईशान्य मुंबईत दलित, मराठी, मुस्लीम, गुजराती असा वेगवेगळ्या प्रभावांचा मतदार आहे. त्यामुळे या सर्व वर्गांना मान्य होणारा उमेदवार इथे तरला जाण्याची शक्यताय. असं असलं तरी शिवसेना-भाजपमध्येच इथे प्रामुख्याने लढाई होण्याची शक्यता असून राष्ट्रवादीला दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी परिस्थिती येऊ शकते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *