सोनिया गांधी नव्हे, आता रायबरेलीतून प्रियांका गांधी लढणार?

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी या अखेर सक्रीयपणे राजकारणात उतरल्या आहेत. पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी प्रियांका गांधी यांची नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियांका गांधी यांचा राजकीय प्रवेश होणे, ही देशातील सध्याच्या राजकारणातली अत्यंत मोठी घटना मानली जात आहे. कारण प्रियांका …

सोनिया गांधी नव्हे, आता रायबरेलीतून प्रियांका गांधी लढणार?

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी या अखेर सक्रीयपणे राजकारणात उतरल्या आहेत. पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी प्रियांका गांधी यांची नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियांका गांधी यांचा राजकीय प्रवेश होणे, ही देशातील सध्याच्या राजकारणातली अत्यंत मोठी घटना मानली जात आहे. कारण प्रियांका गांधी यांना ‘नेहरु-गांधी’ कुटुंबाचं वलय आहे. त्यात आता अशाही चर्चा सुरु झाल्यात की, प्रियांका गांधी या त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघातून म्हणजे रायबरेलीतून निवडणूक लढू शकतात. राजकीय वर्तुळात या चर्चेला आता वेगही आला आहे आणि  प्रियांका यांच्या राजकीय प्रवेशामुळे काहीसा दुजोराही मिळाला आहे.

आज सोनिया गांधी यांचा रायबरेली दौरा होता. मात्र, तो अचानक रद्द करण्यात आला. यावरुनही प्रियांका यांच्या रायबरेली-कनेक्शनच्या चर्चा जोर धरु लागल्यात. काही दिवसांपूर्वीच रायबरेली येथील आठ ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्यांसाठी प्रियांका गांधी यांचं मत विचारात घेण्यात आले होते. गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी आणि इतर अनेकदा प्रियांका गांधी यांनी सोनिया गांधींसाठी रायबरेलीत प्रचार केला होता.

प्रियांका गांधी यांची तिथं गरज होती. त्यांना उत्तर प्रदेशचा चांगला अनुभव आहे. त्यांचा करिश्मा नक्की निवडणुकीत दिसून येईल. 20 व्या शतकात इंदिरा गांधी होत्या, 21 व्या शतकात प्रियांका गांधी. आता त्यांचा करिश्मा दिसेल. खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या नियुक्तीचा प्रभाव दिसेल. भाजपला आम्हाला विरोध करणं हा त्यांचा नेहमीचा कार्यक्रम आहे. राहुल गांधी हा धोरणात्मक निर्णय घेतला, याबद्दल त्यांचं अभिनंदन. राहुलजींच्या या निर्णयाचा चांगला परिणाम दिसेल. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा यांचं आव्हान निर्माण झालं होतं. त्याला या निर्णयामुळं उत्तर मिळेल. – माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे

रायबरेली आणि शेजारील अमेठी असे दोन्ही लोकसभा मतदारसघ नेहरु-गांधी घराण्याचे बालेकिल्ले मानले जातात. त्यामुळे हे मतदारसंघ प्रियांका गांधी यांच्यासाठी काही नवीन नाहीत. 2014 नंतर सोनिया गांधी या फारशा रायबरेलीत गेल्या नाहीत. त्यात मध्यंतरी त्यांची प्रकृतीही बरी नव्हती. त्यामुळे त्यांच्या रायबरेली दौऱ्यांमध्ये खंड पडत गेला. आता रायबरेलीची कमान प्रियांका गांधींच्या खांद्यावर दिलू जाऊ शकते. रायबरेलीतील जनता ही ‘नेहरु-गांधी’ कुटुंबाशी एकनिष्ठ समजली जातात. त्यामुळे इथून प्रियांका गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढणं, त्यांच्यासाठी सुरक्षित असेल, यात शंका नाही. प्रियांका गांधी रायबरेलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कायम संपर्कात असतात. त्यांच्या गाठी-भेटी घेत असतात.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातूनच प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय झाल्याने याचा फायदा नक्कीच काँग्रेसला होणार आहे. 2017 मध्ये ज्यावेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी झाली, त्यावेळीही प्रियांका गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *