पंतप्रधान आवास योजनेत पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्र्यांना ग्रामविकास योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या 9000 कोटी रुपयांचा धनादेश यावेळी प्रदान केला. भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रामविकास यंत्रणेने महत्त्वाकांक्षी राबवलेल्या प्रकल्पांची माहिती पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रधानमंत्री आवास योजनेत विक्रमी कामगिरी केली आहे.एका वर्षात तब्बल पाच लाख घरे पूर्ण करून लाभार्थ्यांना चाव्यांचे वितरण करण्यात आले आहे.पुढील वर्षी आणखी १५ लाख घरांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात केली आहे.
सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर आयोजित घरकुल वितरण सोहळ्यात ते बोलत होते. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कराड- उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, २०१६ ते २०२२ या कालावधीत केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्याला १२ लाख ९० हजार घरांचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यानंतर नव्याने अनेक गरजू कुटुंबांची नावे समोर आल्याने आणखी ३० लाख घरांची गरज निर्माण झाली. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात आला असून, पुढील दोन ते तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात घरकुलांचे वितरण होणार आहे. राज्य सरकारकडून प्रत्येक घरकुलासाठी अतिरिक्त ५० हजार रुपयांची मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळालेल्या लाभार्थ्यांना सौरऊर्जेसाठी अनुदान देऊन आयुष्यभर मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करण्याची तयारी
शेतकरी प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असून केंद्र सरकारच्या सहकार्याने त्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबतही केंद्रीय स्तरावर बैठक घेऊन निर्णय करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सकारात्मक असून, ३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचाही निर्णय सरकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या सक्षमीकरणावर भर देताना फडणवीस म्हणाले, गेल्या दोन वर्षांत राज्यातील ५० लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्यात यश आले असून, हा आकडा एक कोटीपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे.कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचाही उल्लेख करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. “हे सरकार सर्वसामान्य, शेतकरी आणि कामगारांचे सरकार आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना देशहितासाठी ऊर्जा बचतीचे आवाहन केले.
विक्रमी वेळेमध्ये ग्रामविकास विभागाने पाच लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल ग्रामविकास विभाग त्या विभागाचे तत्कालीन सचिव आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे मुख्यमंत्र्यांनी तोंड भरून कौतुक केले. ग्रामविकास विभागाचे मंत्री जयकुमार यांनी घरकुल उद्दिष्ट पूर्तीचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले .
केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील संपूर्ण जनतेला सुखकर जीवनासाठी पक्क्या घरांचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट हातात घेतले असून महाराष्ट्रातील प्रशासन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पक्क्या घराच्या माध्यमातून पोहोचत आहे. पुढील वर्षी 15 लाख घरांचे वितरण कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने पुन्हा लाडक्या भावांचे आणि बहिणींचे अर्ज मागविण्यात येत आहेत सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्याची ग्रामविकास विभाग सातत्याने कार्यरत आहोत .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी संघटितपणे एकत्र काम करूया पुढच्या वेळेला पुन्हा येथे कार्यक्रमासाठी येण्याकरता मला नक्की आवडेल असेही केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले महाराष्ट्राला 30 लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले होते .पैकी पाच लाख घरांचे विक्रमी वेळेमध्ये करण्यात आलेले वितरण यामध्ये ग्रामविकास विभागाचे सर्व प्रशासन आणि संबंधित अधिकारी यांच्या संघटित प्रयत्नाला यश आले आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या भविष्याच्या दृष्टीने आपल्याला काही काटकसरीचे मंत्र दिले असून त्याची अंमलबजावणी करणे हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आदेशानुसार पुढील वर्षी 15 लाख घरांची बांधणी करून त्याच्याही घरांचे वितरण तातडीने करण्याच्या दृष्टीने ग्रामविकास यंत्रणा कधीही कमी पडणार नाही .महाराष्ट्रात एकही माणूस बेघर राहणार नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आपण सामूहिकपणे सत्यात उतरवून याकरिता सातत्याने आपण सक्रिय राहूया असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले .