विसर्जन मिरवणुकीत नको तेच घडलं, हलगी वादक दगावला, थेट ट्रॉलीखाली…
पुण्यामधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणपती विसर्जनादरम्यान मिरवणुकीत ट्रॉलीखाली आल्याने एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या...

पुण्यामधून धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात घोरपडीत विसर्जन मिरवणुकीत ट्रॉलीखाली येऊन १८ वर्षीय हलगी वादकाचा मृत्यू झाला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे मार्गावर शुक्रवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात १८ वर्षीय हलगी वादकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. विघ्नेश पवार असे मृत युवकाचे नाव आहे.
नेमकी घटना काय घडली?
मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बी. टी. कवडे मार्गावर गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. यावेळी रामटेकडी येथील हलगी वादक विघ्नेश पवार हा एका गणेश मंडळाच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीच्या मागील बाजूस बसला होता. मिरवणूक काळूबाई चौक परिसरात आली असता विघ्नेश हा ट्रॉलीच्या चाकाखाली आल्याची घटना घडली. या अपघातात ट्रॉलीचे चाक त्याच्या छातीवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंढवा पोलिसांनी आवश्यक कार्यवाही सुरू केली असून,अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
ऐन गणेश विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहात घडलेल्या या भीषण अपघातामुळे रामटेकडी आणि घोरपडी परिसरात शोककळा पसरली आहे. विघ्नेशच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्यासोबत वाद्य वाजवणाऱ्या सहकाऱ्यांनाही या घटनेचा मोठा धक्का बसला. उत्सवाच्या आनंदात अचानक आलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि गणेशभक्तांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विसर्जन मिरवणुकीदरम्यान ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच डीजे आणि ध्वनिवर्धकांच्या वाहनांभोवती मोठी गर्दी होत असते. अशा वेळी वाहनचालकांकडून किंवा मिरवणुकीतील सहभागींकडून निष्काळजीपणा झाल्यास अपघाताचा धोका वाढतो. या घटनेमुळे मिरवणुकीतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंढवा पोलिल स्टेशनमध्ये अपघाताची नोंद
या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. ट्रॅक्टर चालकाचा निष्काळजीपणा होता का किंवा अपघातामागे अन्य काही कारण आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. मिरवणुकीदरम्यान वाहनांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक नियम आणि आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
