
राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तीन जण महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, नवाब मलिक यांच्या बहीण डॉ. सईदा खान आणि कप्तान मलिक यांच्या सून बुशरा नदीम मलिक हे तिघे निवडणूक लढवणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मलिक कुटुंबातून यंदा ३ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक हे प्रभाग क्रमांक १६५, नवाब मलिक यांची बहीण डॉ. सईदा खान या प्रभाग क्रमांक १६८ तर कप्तान मलिक यांची सून बुशरा नदीम मलिक या प्रभाग क्रमांक १७० मधून निवडणूक लढणार आहेत. कप्तान मलिक यांचा प्रभाग १७० सध्या महिला राखीव झाल्याने, कप्तान मलिक यांनी या वार्डात आपल्या सुनेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे, तर ते स्वत: प्रभाग क्रमांक १६५ मधून निवडणूक लढवणार आहेत. एकाच कुटुंबातील तीन जण निवडणूक लढवणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान दुसरीकडे राज्यात महापालिका निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार आहे, तर काही ठिकाणी या युतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट देखील सहभागी होणार आहे, दरम्यान जिथे राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत होणार नाही, तिथे-तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युतीसाठी अजित पवार गटाचं बोलणं सुरू होतं मात्र ही चर्चा फिसकटल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 35 उमेदवारांची नावं फायनल
दरम्यान मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई महानगर पालिकेसाठी ३५ उमेदवारांची यादी फायनल करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना आज एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे. सुनील तटकरे यांनी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली होती, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.