बिबट्याचं कुटुंब रंगलंय संजय गांधी उद्यानात, नवीन सर्वेक्षणात 54 बिबटे आढळले
बिबट्यांच्या या अभ्यासात संशोधनाबरोबरच क्षमता बांधणीवर सुद्धा भर देण्यात आला आणि 50 हून अधिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर तंत्रज्ञान वापराचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे भविष्यातील अभ्यास स्थानिक पातळीवर देखील होऊ शकेल असे म्हटले जात आहे.

बोरीवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे एक चमत्कार मानला जातो. जगातल्या कुठल्याच शहरी वस्तीपासून जवळ असलेल्या जंगलात बिबट्यांचा अधिवास नाही. येथे बिबटे आहेत म्हणजे बिबट्यांना शिकार करण्यासाठीची अन्न साखळी असणारे हे समृद्ध जंगल आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) आणि शेजारच्या तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य (TWLS) परिसरातील बिबट्यांची संख्या मोजण्यात आली. त्यात मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि लगतच्या परिसरात 54 बिबट्यांची नोंद करण्यात आली आहे.
बोरीवलीचे संजय गांधी उद्यानातील बिबटे आणि या शहरातील माणसे यांच्या अनोख्या सहजीवनाची कहाणी जगावेगळी आहे. या परिसरातील बिबट्यांची संख्या मोजण्यात आली आहे. SGNP, आरे दुग्ध वसाहत परिसर आणि तुंगारेश्वर अभयारण्यामध्ये करण्यात आलेले हे सर्वेक्षण फेब्रुवारी ते जून २०२४ दरम्यान पार पडले आहे. यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात ५७ ठिकाणी आणि तुंगारेश्वर परिसरात ३३ ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते.
या संपूर्ण अभ्यासात वन विभागाचे कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले आणि बिबट्यांच्या गणतीसाठी विशेष प्रशिक्षण सत्रेही आयोजित करण्यात आली होती. सर्वेक्षणात 54 बिबट्यांची नोंद झाली आहे. यामध्ये 36 मादी आणि 16 नर होते तसेच 2 बिबट्यांचे लिंग निर्धारण होऊ शकले नाही. याव्यतिरिक्त चार पिल्लांचीही नोंद झाली आहे. तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात तीन प्रौढ नर बिबट्यांची नोंद झाली आहे.
विशेष म्हणजे 2015 मध्ये प्रथमच कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपल्या गेलेल्या तीन मादी 2024 मध्ये पुन्हा एकदा कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसल्या आहेत.याचाच अर्थ मागील नऊ वर्षांहून अधिक काळापासून त्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहत आहेत. कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट्यांबरोबरच चितळ, सांबर, रानमांजर, पाम सिव्हेटसारखे सस्तन प्राणी तसेच पिसूरी ( माऊस डीअर ) आणि रस्टी स्पॉटेड कॅटसारख्या दुर्मिळ प्रजातीही आढळल्या आहेत.
9 किमी अंतर पार करून बिबट्या वसई किल्ल्यात
या अभ्यासादरम्यान एक विशेष घटना नोंदवली गेली आहे. बिबट्यांना तोंड द्यावे लागत असलेल्या आव्हानांची यातून मुंबईकरांना कल्पना येऊ शकते. प्रथम तुंगारेश्वर अभयारण्य परिसरात आढळलेला एक नर बिबट्या सुमारे 9 किलोमीटर अंतर पार करून घनदाट मानवी वस्त्या, महामार्ग आणि रेल्वे मार्ग ओलांडून वसई किल्ल्यापर्यंत पोहोचल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेतून या बिबट्यांची परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमता दिसून येते.
