तब्बल 21 वर्षांनी मुलगा झाला,बाळाला पाळण्यात ठेवून कृष्णेच्या पात्रात प्रवास करीत नवस केले पुर्ण

सांगलीत आज नवस फेडण्याचे शेकडो वर्षांची परंपरा अनोख्या पद्धतीने पाळण्यात आली. एका दाम्पत्याला २१ वर्षांनी मुलगा झाल्याने त्याला पाळण्यात बसवून नदीतून प्रवास करती ही अनोखी प्रथा आज पाळण्यात आली.

तब्बल 21 वर्षांनी मुलगा झाला,बाळाला पाळण्यात ठेवून कृष्णेच्या पात्रात प्रवास करीत नवस केले पुर्ण
A unique tradition in sangli
| Updated on: Aug 19, 2025 | 5:34 PM

भारतात श्रद्धेपोटी अनेक प्रथा आणि परंपरा शेकडो वर्षे चालत आल्या आहेत. सांगलीतही नवस फेडण्याची शेकडो वर्षांची परंपरा पाळण्यात आली. एका दाम्पत्याला २१ वर्षांनी मुलगा झाला, त्यामुळे कृष्णा नदीला मोठा पुर आला असतानाही या बाळाला लाकडी पाळण्यात ठेवून स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा प्रवास करत नवस फेडण्यात आले. कोयना धरणातून सोडलेल्या जादा पाण्यामुळे कृष्णा नदीला मोठा पूर आला होता.त्यातही नवस फेडण्याची ही प्रथा पाळण्यात आली.

सांगलीत आज नवस फेडण्याची शेकडो वर्षांची अनोखी प्रथा आज सांगलीकराना पाहायला मिळाली. लग्नाच्या तब्बल 21 वर्षानंतर नवसाने एका दाम्पत्याला मुलगा झाला. याच नवस फेडण्यासाठी कृष्णा नदीतील पुराच्या पाण्यात लाकडी पाळण्यामध्ये बाळाला ठेऊन स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा प्रवास करत हा दाम्पत्याने नवस फेडले. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णेची पातळी चांगलीच वाढली असतानाच आंबी समाजाच्या मदतीने वाहत्या पाण्यात बाळाला घेऊन नवस फेडल्याची ही अनोखी प्रथा आज सर्वांना पाहायला मिळाली.

कर्नाटकातील निप्पाणी गावात राहणारे रवींद्र वाळवे यांचं 20 वर्षांपूर्वी लग्न झालं. लग्नानंतर अनेक वर्षे लोटली तरीही दांपत्याला मुल होत नव्हतं. अनेक प्रयत्न करून हे दाम्पत्य थकले. रवींद्र वाळवे यांचे आजोळ हे सांगली आहे. या आजोळी असणाऱ्या नातेवाईकांनी त्यांना पुर्वापार चालत आलेल्या परंपरेबाबत माहिती दिली. यानंतर या दाम्पत्याने सांगलीत येऊन चार वर्षांपूर्वी मुलं व्हावं असा नवस बोलले होते. या नवसानंतर त्यांना एक मुलगा झाला.

आंबी समाजाची मदत घेण्याची प्रथा

यानंतर हे दाम्पत्य नवस फेडण्यासाठी कुटुंबियांसह सांगलीतील सरकारी घाटावर आले होते. कृष्णा माईची सेवा करणाऱ्या आंबी समाजाच्या मदतीने पाळणा सजवण्यात आला. कृष्णेच्या पाण्यात नेहमी पोहणारे आंबी यांची मदत घेऊन नवस फेडण्याची लगबग सुरु झाली. कृष्णा काठावरील स्वामी समर्थ घाटाजवळून सजवलेल्या पाळण्यात ‘वीर’ या मुलाला नारळ घेऊन बसवण्यात आले. स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा वाहत्या पाण्यातून प्रवास करत नवस फेडण्यात आले.

अनेक वर्षांपासून सुरु असलेली परंपरा

कोयना धरण क्षेत्रासह सांगली आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे.या पाऊसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.असे असले तरी नेहमीच कृष्णा माईची सेवा करणाऱ्या आंबी समाजाच्या तरुणांनी धाडसाने वाहत्या पाण्यात नवस फेडण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले. कोणाला जर मूल होत नसेल तर त्यांनी हा नवस बोलण्याची शेकडो वर्षांची येथे प्रथा आहे. नवस पूर्ण झाल्यानंतर तो फेडण्यासाठी आंबी समाजाच्या मदतीने पूर्ण करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली परंपरा क्वचितच काही जणांना माहित आहे.