150000 घेऊन जगावेगळं काय शिकवतात? अभिजीत दीपकेंनी खासगी शाळांच्या लुटमारीच्या विरोधात दंड थोपटले
अभिजीत दीपके यांनी खासगी शाळांच्या लुटमारीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याविरोधात दीपकेंनी आता मोठा अॅक्शन प्लान आखला आहे.

नीट पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीने खासगी शाळांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. खासगी शाळांच्या लुटमारीविरोधात अभिजीत दीपके यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता कॉक्रोच जनता पार्टी ग्रामीण भागातील सरकारी शाळा सुधारल्या पाहिजे, यासाठी दीपकेंनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी सरकारला प्रस्ताव देण्यासहित गावकऱ्यांना देखील सोबत घेऊ, असे दीपकेंनी सांगितले.
अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा भारतीय शिक्षण व्यवस्थेची चिरफाड केली. त्यांनी खासगी शाळेच्या लुटमारीवर टीका केली. अभिजीत दीपके म्हणाले, ‘८० वर्षांत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्ष होतायत. पण ८० वर्षांनंतरही आपल्या देशातल्या शाळा आहेत. त्या खास करून ज्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत, अतिशय वाईट परिस्थितीत आहेत. त्यावर कोणीच लक्ष दिलेलं नाही. या देशात म्हणजे आपण पाहिलं की कसे नोटाबंदीनंतर हेडक्वार्टरवर हेडक्वार्टर बांधण्यात आले. आता नवीन संसद भवन बांधण्यात आलं. नवीन पीएम हाउस बांधण्यात आलं. पण शाळांचं काय? जे ग्रामीण भागातले शेतकऱ्यांची मुलं असू द्या, मजुरांची मुलं असू द्या. मजुरांची मुलं असू द्या. काय ते या देशाचं भविष्य नाहीये? काय सरकार यांना त्या मुलांना या देशाचं भविष्य म्हणून बघत नाही का? तो कुठं ना कुठं आम्हाला असं म्हणायचं आहे किंवा आम्हाला असं वाटतं की आता ८० वर्ष होत आले. तर या ८०व्या वर्षाची सुरुवात जी आपण केली पाहिजे, ती ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांची सुधारणा केली पाहिजे. कारण की त्याच्याशिवाय आपला देश पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही. कारण की बहुतांश लोक गावाखेड्यात राहतात. तर तुम्ही त्या मुलांना दुर्लक्ष करून या देशाचा विकास करू शकत नाही’.
शाळेच्या लुटमारीवरही दीपकेंनी टीका केली. ‘ फीवर ‘कॅप’ लागला पाहिजे. आमच्या योजनांचा अभ्यास करणारी टीम त्यावर काम करत आहे. खासगी शाळा अवघ्या पहिली-दुसरीच्या शिक्षणासाठी एक ते दीड लाख रुपये घेऊ शकत नाही. दीड लाख घेऊन जगावेगळं काय शिकवतात? पालकांचं उत्पन्न नाहीए. ए.बी. सी.डी शिकवण्याचे एक-दीड लाख रुपये घेतात. खासगी शाळेच्या फीवर ‘कॅप’ लागली पाहिजे. शिक्षणाच्या नावाखाली लुटमार सुरू आहे. शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. तो व्यवसाय नाही,असेही त्यांनी म्हटले.
‘खासगी शाळा, कोचिंग क्लास चालवणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मध्यमवर्गीय लोकांची लुटमार करू नये. तुम्हाला शिक्षण द्यायचं असेल, धंदा म्हणून देऊ नका. तर विद्या म्हणून द्या. याबाबत सरकारला प्रस्ताव देऊ. आधी गावकऱ्यांना सोबत घेऊ. गावाचा विकास गरजेचा आहे. तरच देशाचा विकास होईल’, असे त्यांनी सांगितले. ‘ग्रामीण भागातील सरकारी शाळा सुधारल्या पाहिजे. तुम्ही त्या विद्यार्थ्यांना दुर्लक्षित करू शकत नाही. १५ तारखेला हिंगोलीच्या संतुक पिंपरी गावात जाणार आहे. गावातील शाळेसाठी काहीतरी करा, असं सरपंचांना सांगणार असल्याचे दीपकेंनी सांगितले.
‘दिल्लीत 20 जून रोजी तारखेला प्रकार घडला होता. तसाच प्रकार झारखंडमध्ये घडलाय. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलाय. अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. राजकीय नेते आंदोलन करत असताना अश्रूधूराच्या नळकांड्या का फोडत नाही? हे मला काही समजत नाही. लाठीचार्ज विद्यार्थ्यावरच का होतोय? आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी ९ दिवस उपोषण केलं. तरीही त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यांना मारहाण झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सरकारने विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांवर अत्याचार करून काय मिळणार आहे, विद्यार्थ्या त्यांच्या हक्कासाठी लढत आहे. कोणत्याही व्होटबँकसाठी लढत नाही. त्यांच्यावर लाठीचार्ज झाला नाही पाहिजे, असे त्यांनी पुढे म्हटले.