वारीबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर अबू आझमी यांचा माफीनामा, म्हणाले, ‘माझे वक्तव्य…’
वारी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अबू आझमी यांनी माफी मागितली आहे. ते म्हणाले, माझ्या वक्तव्यामुळे गैरसमज पसरवण्यात आले. माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावनांना ठेच पोहचली असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. माफी मागतो.

Abu Azmi on Pandharpur Palki Statement: महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आझमी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. भाजपसह इतर पक्षांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आता अबू आझमी यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, माझ्या वक्तव्यामुळे गैरसमज पसरवण्यात आले. माझे वक्तव्य तोडून मोडून दाखवले गेले. माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावनांना ठेच पोहचली असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. माफी मागतो. कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, असे आझमी यांनी म्हटले आहे.
आझमी पुढे म्हणाले की, मी एक निष्ठावंत समाजवादी कार्यकर्ता आहे. मी नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती, सुफी संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो. वारी परंपरेचे पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. वारीची परंपरा महाराष्ट्राच्या आंतरधर्मीय, समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अभिमानास्पद भाग आहे. मी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लिम समुदायाविरुद्ध होणाऱ्या भेदभावाच्या आणि त्यांच्या हक्कांच्या संदर्भात केला होता. मी कोणत्याही प्रकारची तुलना केली नव्हती. माझा हेतू आणि माझी मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी तसे म्हटले होते. अल्पसंख्याक समुदायाच्या मनात या देशात वेगवेगळे कायदे आहेत, अशी भावना निर्माण होऊ नये, हा माझा हेतू होता, असे आझमी यांनी म्हटले.
हाल ही में सोलापुर में मेरे द्वारा की गई एक टिप्पणी को लेकर जो गलतफहमियाँ फैली हैं, मैं उन्हें स्पष्ट करना चाहता हूँ। मेरे वक्तव्य को तोड़–मरोड़ कर और दुर्भावनापूर्ण ढंग से प्रस्तुत किया गया। यदि इससे वारकरी सम्प्रदाय की धार्मिक भावना आहत हुई हो, तो मैं अपने शब्द पूरी तरह से वापस…
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) June 23, 2025
अबू आझमी काय म्हणाले होते
वारीमुळे रस्ता जाम होतो. हिंदूंचे सण साजरे केले जातात. तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही. मात्र, मुसलमानांनी रस्त्यावर नमाज केल्यावर तक्रारी केल्या जातात. मशिदी बाहेर नमाज पडू शकत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात, बाहेर जर नमाज पडला तर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग परवाना ही रद्द केला जाईल. पण वारीमुळे रस्ता जाम होतो. आम्ही कधी त्याला मनाई केले नाही, असे वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केले होते.
