
एसी लोकलमध्ये बनावट सीझन पासचा वापर करून प्रवास करणाऱ्या एका हायप्रोफाइल इंजिनिअर दाम्पत्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. पतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हा बनावट पास तयार केला होता. मात्र, एका सतर्क टीसीमुळे त्यांची ही फसवणूक उघडकीस आली. यामुळे या दोघांनाही थेट तुरुंगाची हवा खावी लागल्याचे पाहायला मिळाले.
बुधवारी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी कल्याण-सीएसएमटी एसी लोकल ट्रेनमध्ये तिकीट तपासणी सुरू होती. टीसी विशाल नवले तिकीट तपासत असताना त्यांनी प्रवासी गुडिया ओमकार शर्मा यांना पास दाखवण्यास सांगितले. गुडिया शर्मा यांनी त्यांच्या मोबाईलवर सीझन पास दाखवला. मात्र, टीसी नवले यांना काही गोष्टी खटकल्या. हा पास हा रेल्वेच्या अधिकृत UTS ॲपऐवजी थेट गुगल क्रोम (Google Chrome) ब्राउझरवर दिसत होता. या पासवर QR कोड उपलब्ध नव्हता, जो डिजिटल पाससाठी आवश्यक असतो.
टीसी विशाल नवले यांनी लगेचच सतर्कता दाखवत पासवरील UTS क्रमांक रेल्वेच्या हेल्पलाईनवर तपासला. या तपासणीत धक्कादायक सत्य समोर आले. हा पास कालबाह्य झाला होता. हा पास गुडिया शर्मा यांच्या नावावर नसून, त्यांचे पती ओमकार शर्मा यांच्या नावावर होता.
यावर टीसीने गुडिया शर्मा यांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान, गुडिया यांनी कबूल केले की, हा पास त्यांचे पती ओमकार शर्मा यांनी AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून बनावट स्वरूपात तयार करून दिला होता. जेणेकरून त्यांना एसी लोकलमध्ये प्रवास करता येईल. ओमकार शर्मा हे इंजिनिअर असून गुडिया शर्मा या एका खाजगी बँकेत मॅनेजर आहेत.
एकाच बनावट पासवर दोघांनी प्रवास करून शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यावर टीसी विशाल नवले यांनी तातडीने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी ओमकार शर्मा आणि गुडिया ओमकार शर्मा यांच्यावर फसवणूक आणि बनावट दस्तऐवज तयार करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहमार्ग पोलिसांनी या दोघांनाही तातडीने अटक केली आहे.
सध्या कल्याण लोहमार्ग पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिस हे AI रॅकेट मोठे आहे का? तसेच या दाम्पत्याने AI चा वापर करून आणखी कोणासाठी असे बनावट पास तयार केले आहेत का? याचा शोध घेत आहेत. हा हायप्रोफाइल प्रकार उघडकीस आल्याने रेल्वे प्रवासात AI चा गैरवापर करून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे का, याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.