मला मित्रासोबत बोलायचं, कैद्याची पोलिसाकडे मागणी, नकार मिळताच केलं असं काही… कल्याण जेलमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात एका कैद्याने धक्कादायक कृत्य केले. मित्राशी बोलण्याची परवानगी न मिळाल्याने संतप्त झालेल्या हितेंद्र ठाकूर या कैद्याने ड्युटीवरील पोलीस हवालदार प्रभू चव्हाण यांच्यावर दगडफेक केली. यात हवालदार चव्हाण किरकोळ जखमी झाले.

कल्याणमधील आधारवाडी कारागृहात गंभीर घटना उघडकीस आली आहे. जेलमध्ये असलेल्या एका कैद्याला त्याच्या मित्रासोबत गप्पा मारण्याची परवानगी न दिल्याने संतप्त झालेल्या कैद्याने धक्कादायक कृत्य केले आहे. या कैद्याने थेट ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. या झटापटीत संबंधित पोलीस हवालदार किरकोळ जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
हितेंद्र उर्फ हितेन गुलीवर ठाकूर (३०) असे दगडफेक करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. हितेंद्र हा एका गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास, जेलमधील सर्कल सहा नावाच्या भागात पोलीस हवालदार प्रभू चव्हाण हे आपले काम करत होते. त्याचवेळी हितेंद्र ठाकूर त्यांच्याकडे आला. त्याने हवालदार चव्हाण यांच्याकडे एक मागणी केली. हितेंद्रने सांगितले की माझा दुसरा कैदी मित्र सुनीलसिंग धारासिंग लबाना याला माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी पाठवावे.
पण जेलचे काही नियम असतात. त्यानुसार कैदी आपल्या मनाने कोणासोबतही आणि कधीही गप्पा मारू शकत नाहीत. हवालदार प्रभू चव्हाण यांना माहित होते की हितेंद्रची ही मागणी नियमांविरुद्ध आहे. त्यामुळे त्यांनी हितेंद्रला त्याच्या मित्रासोबत गप्पा मारण्यासाठी परवानगी दिली नाही. या हवालदारांनी सुनील सिंगला हितेंद्रकडे सोडण्यास स्पष्ट नकार दिला. हवालदार चव्हाण यांनी ऐकले नाही, यामुळे हितेंद्र ठाकूरला खूप राग आला. संतापलेल्या हितेंद्रने लगेच हवालदारांना खूप अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याने त्यांना धमक्याही दिल्या.
प्रकरणाचा पुढील तपास सुरु
हवालदार चव्हाण यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण हितेंद्र काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने रागाच्या भरात बाजूला पडलेले दगड आणि सिमेंटचे तुकडे उचलले. ते थेट ड्युटीवर असलेल्या हवालदार प्रभू चव्हाण यांच्या दिशेने फेकले. या दगडफेकीत हवालदार प्रभू चव्हाण यांना किरकोळ जखम झाली. या गंभीर घटनेनंतर, जखमी हवालदार प्रभू चव्हाण यांनी लगेच आरोपी हितेंद्र उर्फ हितेन गुलीवर ठाकूर याच्याविरोधात कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी हितेंद्र ठाकूरवर दंगामस्ती, शिवीगाळ, दमदाटी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे. खडकपाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
