आफ्टर मोदी हू? पंतप्रधानांनी निवृत्त व्हावं? उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले…

उद्धव ठाकरेंनी मोहन भागवत यांच्या 75 व्या वर्षी निवृत्ती घेण्याच्या सूचनांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रश्नाला भाजप आणि संघाचा अंतर्गत विषय मानले आहे. मोदींच्या निवृत्तीबाबतच्या चर्चेवर त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या राजकारणाऐवजी राष्ट्राच्या हितासाठी काम करावे असेही म्हटले आहे.

आफ्टर मोदी हू? पंतप्रधानांनी निवृत्त व्हावं? उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले...
uddhav thackeray pm modi
| Updated on: Jul 20, 2025 | 8:02 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सार्वजनिक जीवनात कार्यक्रत असलेल्या व्यक्तींनी 75 व्या वर्ष पद सोडून निवृत्ती घेतली पाहिजे, असा सल्ला दिला आहे. भागवत यांच्या या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे हा सल्ला दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आफ्टर मोदी हू? असा सवाल विचारला जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी स्पष्टच मते व्यक्त केली आहेत.

दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा अंतिम भाग आज दैनिक सामनात प्रसिद्ध झाला आहे. यात उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या निवृत्तीवर भाष्य केलं आहे. आफ्टर मोदी हू? हा भाजप आणि संघाचा अंतर्गत विषय आहे. त्यांनी तो अंतर्गत विषय केला आहे. मात्र, मोदींच्या निवृत्तीवर संघाचा विचार सुरूही झाला असेल. त्यांच्याकडे त्याचं उत्तरही असेल. जेव्हा त्यांच्याकडे उत्तर असेल तेव्हाच मला वाटतं मोहनजी बोलले असतील. ते बिना उत्तराचे बोलणार नाहीत, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

कदाचित निवृत्ती जाहीर करतील

पंचाहत्तरीची शाल भागवतजींनी घातली आहे. बघू आता. आता बोले तैसा चाले आहे की वाकडे यांची पावले आहेत हे पाहता येईल. भागवतही 75 वर्षाचे आहेत. भाजपने 75 व्या वर्षी निवृत्ती घेण्याचं धोरण ठरवलेलं आहे. पण मोदींच्या बाबतीत बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावलं की वाकडी पडती पाऊले हे आता कळेल. कदाचित मोदी निवृत्ती जाहीर करतील, अशी शक्यता उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे.

हे गैर आहे

पंतप्रधानांनी राजकीय पक्षाचा प्रचार करू नये या मुद्द्यालाही त्यांनी परत हात घातला. ठिक आहे. आपली लोकशाही आहे. ज्याच्याकडे बहुमत असतं त्याचा पंतप्रधान बनतो. ही लोकशाही आहे. एकदा का तो पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो पक्षाचा राहता कामा नये, तो देशाचा आणि राज्याचा झाला पाहिजे. आपल्याकडे ही पद्धत आर्धी आहे. बहुमत मिळाल्यावर तो पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होतो. पण पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री झाल्यावर तो त्या पक्षा पुरता मर्यादित राहतो हे गैर आहे. तुम्ही देशाचे पालक आहात. राज्याचे पालक आहात. संविधानाची शपथ घेतल्यावर तुम्ही सर्वांनी समानतेने वागवलं पाहिजे, असं ते म्हणाले.

पायंडा मोडला पाहिजे

मुख्यमंत्री असताना आताच्या प्रथेप्रमाणे मीही माझ्या पक्षाचा प्रचार केला असेल. पण तो पायंडा आपण मोडला पाहिजे. जसं विधानसभा अध्यक्ष किंवा लोकसभा अध्यक्ष… जसं मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते तेव्हा ते पक्षाच्या कार्यक्रमाला येत नसत. दत्ताजी नलावडेही पक्षाच्या कार्यक्रमाला यायचे नाही. आले तर भाषण करायचे नाही. उलट आमदारांसाठीचं प्रशिक्षण असेल तर ते यायचे. मनोहर जोशीही यायचे नाही. हे असं असलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.