
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींच्या दृष्टीने आज महत्त्वाचा दिवस आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वांद्रयाच्या ताल लँड एन्ड हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन बडे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री आहेत. संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे उदय सामंत यांच्या भेटीसाठी का पोहोचले? ते अजून समजू शकलेलं नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या दिवसात मोठा टि्वस्ट पहायला मिळू शकतो.
सध्या महाराष्ट्रात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरु आहेत. दोन्ही बाजूंकडून युतीसाठी सकारात्मक घडामोडी सुरु होत्या. पॉझिटिव्ह पावलं उचलली जात होती. त्यात अचानक राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सामान्यतह: महाराष्ट्रातील काही प्रश्न असतील, तर मंत्रालयात भेट होते. पण ही भेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झाल्याने मनसे नेमकी कोणासोबत आहे? हा प्रश्न निर्माण होतोय.
‘आजही आमची राज ठाकरे यांना ऑफर’
“राज ठाकरे हे दरवेळी जेव्हा भेटतात तेव्हा त्यांची काम असतात, काही सूचना असतात. पुढची राजकीय परिस्थिती काय असेल त्यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही. या भेटीवर राज ठाकरे किंवा मुख्यमंत्री हे खुलासा करतील” असं शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले. “राजकारणात यू टर्न अनेक वेळा पाहायला मिळतात पण जोपर्यंत युती होत नाही, तोपर्यंत बोलता येत नाही. जे काही होईल ते काही दिवसात समजेलच मात्र राजकारणात काही होऊ शकतं. “राज ठाकरे यांना यापूर्वीही आम्ही ऑफर दिली होती, आजही आमची राज ठाकरे यांना ऑफर आहे, सोबत येण्यासाठी. राज ठाकरे हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक लढू शकतात त्यांनी आमच्या सोबत यायला पाहिजे” असं शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट म्हणाले.