
गुरुवारी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला, या दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी खळबळजनक आरोप केला आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह मातोश्रीवर दोन दिवस ठेवण्यात आला होता, त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले, असा आरोप कदम यांनी केला आहे. तसेच याचा तपास व्हायला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान कदम यांच्या या आरोपानंतर आता राजकारणात वातावरण चांगलंच तापलं आहे. कदम यांच्यानंतर आता मंत्री संजय शिरसाट यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नेमकं काय म्हणाले शिरसाट?
त्या काळात मी देखील मातोश्रीला होतो. विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी तिथे तयारी सुरू केली होती. त्यावेळच्या पोलीस कमिश्नर यांनी विचारलं काय झालं? आणि मग दिवाकर रावते आणि त्यांनी तिथे जाऊन ती सर्व तयारी डिमॉलिश केली. शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं होतं, त्यानंतर विनायक राऊत यांनी रचलेलं सरण पुन्हा काढलं, ही झालेली गोष्ट आहे. म्हणून कदम यांनी चुकीचा आरोप केला असं मी म्हणणार नाही, असा मोठा गौप्यस्फोट यावेळी शिरसाट यांनी केला आहे. दरम्यान पुन्हा यावर चर्चा करून मला बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला दुखावयला आवडणार नाही, त्यामुळे त्यावर मी जास्त बोलणार नाही, असंही यावेळी शिरसाट यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कालच्या दसरा मेळाव्याला संजय शिरसाट यांची उपस्थिती नव्हती, त्यामुळे शिरसाट नाराज आहेत, अशी चर्चा सुरू झाली. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठवाड्यातील कोणीही येऊ नये, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं होतं, म्हणून आम्ही आलो नाही, त्यांनी मराठवाड्यातील नेत्यांना फिल्डवरच राहण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे आम्ही सर्व आमच्या कामात होतो. नाहीतर आम्ही देखील तिथे खुर्चीवर बसलेले दिसलो असतो, असं यावेळी संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना निवडणूक आली की हिंदूत्व आठवतं असा टोलाही यावेळी शिरसाट यांनी लगावला आहे.