Sanjay Raut : मराठी विजयी मेळाव्याच्या यशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
"राज ठाकरे आणि माझा कायम संवाद राहिला. हा संवाद राहिल्यामुळेच हे सर्व घडू शकलं. संवाद पाहिजे राजकारणात. जे टीकाकार आहेत, ज्यांच्याशी मतभेद आहेत त्यांच्याशी उत्तम संवाद करण्याला राजकारण म्हणतात. मित्र म्हणून, सहकारी म्हणून, भाऊ म्हणून माझा कायम संवाद राहिला"

“सूत्रधार वगैरे काही नसतं. आम्ही राजकारणात आहोत. समाजकारणात आहोत. पक्षात आहोत. कुटुंबासोबत आहोत. आम्ही ठाकऱ्यांसोबत आहोत जन्मत:च. कुठे काही मिठाचा खडा पडला असेल तर तो काढण्यासाठी आमचा प्रयत्न कामी पडत असेल तर आम्ही तो प्रयत्न केला. सुदैवाने दोन्ही ठाकऱ्यांशी मी त्याच प्रेमाने बोलू शकतो. बोलत राहिलो. त्यातून आजचं चित्र उभं राहिलं” असं संजय राऊत मराठी विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर म्हणाले.
“मला वाटतं की आम्ही आज सण साजरा करत आहोत. नक्कीच आनंदाचा क्षण आहे. प्रत्येक मराठी घराघरात या निमित्ताने गोडधोड होत असेल. सण होत असेल. मला घरामध्ये सांगितलं आज इतका मोठा कार्यक्रम होत आहे. आपल्यासाठी आनंदाचा सण आणि क्षण आहे. तुम्ही त्यासाठी सुंदर एक कोट घालून जा. हे मला घरच्यांनी सांगितलं. प्रत्येकाच्या घरातील याच भावना आहेत” असं राऊत म्हणाले.
मी त्याच चिडीतून उभा राहिलो
उपरोधाने देवेंद्र फडणवीसांना श्रेय दिलं. त्यावर राऊत म्हणाले की, “खरंय ते. मीही देईन. मी त्याच चिडीतून उभा राहिलो. आपण एकत्र आलं पाहिजे. यांना धडा शिकवला पाहिजे. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसांच्या शत्रूंना या जिद्दीतूनच माझ्यासारखा कार्यकर्ता मराठी माणसाचा उभा राहिला आणि हे घडून आलं”
मी राखणदार आहे, मागे बसलो
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का? “मला 100 टक्के खात्री आहे. तसं नसतं तर हा सोहळा पार पडला नसता. पहिल्या रांगेतही ठाकरे आहे. दोन्ही कुटुंब बसले होते. मी राखणदार आहे. मागे बसलो” असं संजय राऊत म्हणाले.
तो संवाद कायम राहिला पाहिजे
“राज ठाकरे आणि माझा कायम संवाद राहिला. हा संवाद राहिल्यामुळेच हे सर्व घडू शकलं. संवाद पाहिजे राजकारणात. जे टीकाकार आहेत, ज्यांच्याशी मतभेद आहेत त्यांच्याशी उत्तम संवाद करण्याला राजकारण म्हणतात. मित्र म्हणून, सहकारी म्हणून, भाऊ म्हणून माझा कायम संवाद राहिला. तो संवाद कायम राहिला पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.
सिंहासन खाली करो, ठाकरे आए है
“आता पुढे जे बसले आहेत महाराष्ट्राचे शत्रू सत्तेत. त्यांनी आवराआवर केली पाहिजे. सिंहासन खाली करो, ठाकरे आए है ही घोषणा आम्ही देणार आहोत. राणे वगैरे कसले विरोधक आहेत. मोदी आणि शहा यांनी हवा भरलेले फुगे आहेत. कोण शिंदे , कोण राणे. हे मोदी शाह हवा भरतात म्हणून फुगले. टाचणी मारली तर फुटून जातील” असं संजय राऊत यांनी सांगितलं.