डॉ. दाभोलकर हत्येचं बीड कनेक्शन समोर

  • Namdev Anjana
  • Published On - 10:15 AM, 23 Nov 2018

महेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड : अंधश्रद्धा निर्मुलन कार्यात बहुमोल योगदान देणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचं बीड कनेक्शन समोर आलं आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येत वापरण्यात आलेली दुचाकी बीडच्या मोरगाव येथे आणून जाळण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. दाभोलकर हत्येचं आणखी काही बीड कनेक्शन आहे का, याचा तपास आता एटीएस करत आहे. दुचाकी जाळून पुरावा नष्ट करणाऱ्या भंगार व्यावसायिक विष्णू जाधवला ताब्यात घेतलं आहे.

मोरगाव हे बीडपासून 37 किलोमीटरवर आहे. शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेले हे मोरगाव आता हत्येशी संबंधित असल्याने कुप्रसिद्ध होऊ लागले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या दुचाकींचा पुरावा याच मोरगाव परिसरात नष्ट करण्यात आला होता.

मोरगावमधील विष्णू जाधव याने या दुचाकी नष्ट केल्या. विष्णू च्या कुटुंबात आई-वडील भाऊ आणि दोन बहिणी आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून विष्णू हा पुण्याला राहतो. त्याचा पुण्यामध्ये भंगारचा व्यवसाय आहे. त्याच्या एका मित्राने त्याला ती दुचाकी भंगारमध्ये विकली होती. मात्र विष्णूने सदर दुचाकी स्वतः वापरली. जेव्हा ही दुचाकी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत वापरात आल्याचे कळताच विष्णू जाधव याने ही दुचाकी त्याच्याच शेतीच्या बाजूला एका खदानीत जाळून टाकली. त्याचे पार्ट पुरुन टाकले.

पाहा व्हिडीओ :

पोलिसांच्या तपासात विष्णूचे नाव आल्याने पोलिसांनी विष्णूला ताब्यात घेतलं आणि जिथं विष्णूने दुचाकी जाळली, त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. या संपूर्ण दुचाकीचा छडा लागला. मात्र यात विष्णूचा काहीच दोष नसून विष्णूच्या मित्राने त्याला फसवल्याचा दावा विष्णूचे नातेवाईक करतात.

मोरगाव येथील शेतात असलेलं हे विष्णूचं पत्र्याचं घर आहे.  विष्णूची वृद्ध आई कर्णबधिर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विष्णू घरी आलाच नसल्याचा दावा त्याची आई करते. विष्णू पुण्यात काय करत होता, त्याचं या प्रकरणाशी संबंध आहे का, याची पुसटशीही कल्पना त्याच्या आईला नाही. मात्र गेल्या दीड महिन्यांपासून पोलीस घरी येत आहेत आणि घराची झाडाझडती करत आहेत, असं त्याच्या आईने सांगितलं.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात वापरण्यात आलेली दुचाकी याच मोरगावात आणून जाळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. मात्र विष्णू बद्दल शेजारीही काहीच बोलायला तयार नाहीत.