
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, मात्र गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांवर संकट ओढवलेलं आहे. ‘शेतकरी’ म्हटलं की हातात शेतीची अवजारे, डोक्यावर रुमाल बांधून काम करताना दिसतो. मात्र गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांसमोर बिबट्याचे संकट उभारले आहे. त्यामुळे शेतात शेतकरी अवजारांऐवजी हातात बंदुका घेऊन उभे आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या वारंवार हल्ल्यांमुळे शेतातील कामासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे मजुरांच्या सुरक्षिततेसाठी शेतकरी हातात बंदुका घेऊन शेतात उभे असल्याचे पहायला मिळाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील खुडसर गावातील शेतकरी सतीश पवार हे आपल्या हातात बंदूक घेऊन शेतमजुरांचे संरक्षण करत आहेत. शेतकरी सतीश पवार यांच्याकडे सुमारे सात एकर जमीन आहे. डिसेंबरमध्ये कांदा लागवडीसाठी शेतमजूर मिळतील, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र त्या भागात बिबट्यांच्या धोक्यामुळे एकही मजूर कामासाठी तयार नव्हता. त्यांमुळे मजुरांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत त्यांनी बंदूक घेऊन शेतात उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हातात बंदूक धरून मजुरांना कांद्याची रोपे लावण्यासाठी शेतात आणले.
खुडसरसह पाथरे, मायगाव, मांजरी या परिसरात सध्या वीस ते पंचवीस बिबटे मुक्तपणे फिरत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या बिबट्यांमी या भागातील अनेक कुत्रे मारले आहेत. पाळीव प्राण्यांप्रमाणे भविष्यात माणसांवरही हल्ले होण्याची शक्यता आहे. दिवसा मजूर शेतात काम करतात. मात्र संध्याकाळी व रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाताना शेतकऱ्यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी बंदुका घेऊन जावं लागत आहे.
बिबट्याचा भयंकर टेरर… चक्क हातात बंदूक घेऊन शेतकऱ्याची शेतात राखण; अहिल्यानगरचा व्हिडीओ व्हायरल#bibtya #leopard #ahilyanagar pic.twitter.com/vpe8RsJufh
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2026
राहुरी तालुक्यातील भागात वनविभागाने पिंजरे लावले असले तरी चार गावांच्या मागे फक्त एकच पिंजरा आहे. तसेच यात बिबटे अडकत नाहीत. त्यामुळे पवार यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी 2010 साली बंदूक परवाना घेतला होता. मात्र आज शेती आणि मजुरांच्या संरक्षणासाठी ही बंदूक वापरण्याची वेळ आली आहे. ‘माझ्याकडे बंदूक आहे, पण इतर शेतकऱ्यांनी काय करायचे?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सरकारने तातडीची पावले उचलली पाहिजेत. बिबट्यांना पकडण्यासाठी अधिक पिंजरे लावावेत. शेतकऱ्यांचे संरक्षण करावे. तसेच रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातच सुमारे 1100 बिबटे आहेत. राहुरी तालुक्यात जवळपास 250 बिबटे आहेत. दररोज कुठे ना कुठे बिबट्यांचे हल्ले होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.