
जगभरात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात एआयमुळे मोठा फायदा होताना दिसत आहे. शिक्षण क्षेत्रातही एआयमुळे मोठी क्रांती झाली आहे. एआय मुळे शिक्षण सोपे झाले आहे. कोणताही अवघड विषय असला तरी एआयच्या मदतीने तो सोप्या पद्धतीने सोडवला जाऊ शकतो. अशातच आता एआयमुळे शिक्षणसंस्था चालतील की नाही असा प्रश्न गोविंददेव गिरी महाराज यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
सोलापुरातील एमआयटी कॉलेजच्या परिसरात स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला गोविंददेव गिरी महाराज उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, विश्वनाथ कराड यांचे प्रेरणास्थान हे स्वामी विवेकानंद आहेत. देशाचा उद्धार करण्याचे लक्ष स्वामी विवेकानंद यांच्या समोर होते. अशा स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे आपल्या विद्यापीठात अनावरण होते हे विशेष आहे.
पुढे बोलताना गोविंददेव गिरी महाराज यांनी म्हटले की, शिक्षा क्षेत्रासमोर मोठी आव्हाने आहेत, शिक्षणसंस्था किती चालतील हे एक मोठा प्रश्न आहे. ज्ञान निळवण्यासाठी जाण्यासाठी आता कुठल्याही विद्यापीठात जाण्याची गरज नाही. आता सगळं ज्ञान प्रत्येकाच्या मोबाईलच्या माध्यमातून मिळतंय. प्राध्यापक शिकवत असलेलं सगळं मोबाईलवर गुगलवर मिळेल. AI नावाची चेटकीण आता येऊन बसलीय, त्यामुळे शिक्षणात केवळ माहिती द्यायची असेल तर मग संस्थाची आवश्यकता नाही. त्यामुळे पुढच्या काळात विद्यापीठांना वर्क फ्रॉम होम करावं लागेल, घरून सगळं विद्यार्थी शिकतील. पुस्तकात असलेलं शिकवण म्हणजे ज्ञान नाही, भारतात माहिती म्हणजे ज्ञान नव्हे.
आपल्या भाषणात गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, स्वामी विवेकानंदचे शिकागोतील भाषण म्हणजे भारताच्या पुनरुत्थानाची सुरुवात होण्याचा दिवस आहे. त्याच्या आधी भारतात रानटी लोकं राहतात असा समज होता, पण स्वामी विवेकानंदच्या भाषणामुळे जगाचे डोळे खाडकन उघडले. ज्ञानचा खजिना उघडणारा पहिला महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद आहेत. आपल्या धर्मांना स्वामीजींनी सेवा शिकवली, भारतमातेची सेवा म्हणजे इथल्या जनतेची सेवा होय. गरीब मुलं शाळेत येऊ शकतं नसतील तर शाळा त्यांच्यापर्यंत न्या हा मंत्र स्वामी विवेकानंद यांनी दिली.
गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, जमशेद टाटा यांना कारखाना काढण्याची प्रेरणा स्वामी विवेकानंद यांनी दिली. भारताला गुलाम करायचं असेल तर इथली शिक्षण पद्धती नष्ट केली पाहिजे असं मेकोले म्हणत होता, आमच्या देशाला गुलाम करण्यासाठी इंग्रजी शिक्षणाचा आरंभ झाला, भूतकाळाबद्दल न्यूनगंड वाटावा अशी व्यवस्था करण्यात आली. 1836 मध्ये इंग्रजी शिक्षणाचा आरंभ झाला पण 2036 मध्ये गुलामगिरीच्या सगळ्या खुणा पुसण्याचा आरंभ आपण केलं पाहिजे. जगभरात व्यापारी देश आहेत, एकीकडे शांतीच्या बाता करायची आणि दुसरीकडे शस्त्र बनवून दुसऱ्या देशांना युद्धात मग्न करणारे देश या जगात आहेत. पण पसायदान सांगणारे जगभरात केवळ एक राष्ट्र आहे ते म्हणजे भारत.